महाष्ट्रातील एकमेव महिला साऊंड इंजिनिअर
कोल्हापूर / पूजा मराठे :
सर और एक टेक. सर सुराला थोडं.. एक बार और करेंगे.. सर टेक डन है..... अशी ऑर्डर ज्येष्ठ गायक उदीत नारायण, के. के., सोनु निगम, अवधुत गुप्ते, अरिजीत सिंग, विजय प्रकाश, बेन्नी, मोहीत चौहान, श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, निधी मोहन, जॉनी तगांदे, निकीता गांधी, नताशा अझीझ, शाहीद माल्या अशा बॉलीवूडमधल्या एक-से-एक गायकांना देत, त्यांचा आवाज रेकॉर्ड करणारी एकमेव महिला साऊंड इंजिनिअर आहे ती म्हणजे उर्मिला सुतार.
उर्मिला ही मुळची कोल्हापूरची. प्रिन्सेस इंदुमती हायस्कूल फॉर गर्ल्स या शाळेत शिकलेली आणि कॉमर्स कॉलेजची विद्यार्थिनी. आता मुंबईमध्ये बॉलीवूडमधल्या मोठमोठ्या गायकांसोबत साऊंड इंजिनिअर म्हणून काम करणारी एकमेव महिला आहे.
साऊंड इंजिनिअरींग क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी उर्मिला मुंबईला पोहोचली. मुंबई विद्यापीठाच्या साऊंड इंजिनिअरींग विभागात डिप्लोमासाठी तिने प्रवेश घेतला. तिच्या वर्गाचा पट 37 होता. 36 मुलं आणि एकमेव मुलगी म्हणजे उर्मिला होती. इथूनच तिने निवडलेल्या या करिअरमध्ये एकमेव स्त्राr असण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. मुंबई विद्यापीठाचा डिप्लोमा झाल्यानंतर तिने साऊंड आयडीयाज् स्टुडीओ या इन्स्टिट्युटमध्ये अॅडव्हान्स ट्रेनिंग घेतले.
तिची पहिली इंटर्नशीप आजीवन या गायक सुरेश वाडकर यांच्या स्टुडीओमध्ये मिळाली. इथे वर्षभर ट्रेनिंग घेतल्यानंतर उर्मिलाने साऊंड आयडीज् यांच्या स्टुडिओमध्ये 4 वर्ष काम केले. त्यानंतर तिने संगीतकार अमित त्रिवेदी यांच्या सोबत 7 वर्ष काम केले. या एकूण 12 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये उर्मिलाने बॉलीवूडमधील अनेक नामवंत गायकांना रेकॉर्ड केले आहे. उर्मिलाच्या वडिलांचा कोल्हापूर साऊंड आणि लाईटचा व्यवसाय अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळे या क्षेत्रातील बाळकडू तिला घरातचं वडिलांकडून मिळाले. साधारण नववीमध्ये असताना उर्मिलाने साऊंड इंजिनिअर होण्याचा ध्यास घेतला होता. यासाठी शाळेच्या सुट्टीच्या कालावधीत ती कोल्हापुरातील साऊंड रेकॉर्डींग स्टुडीओमध्येही जात होती.
गेल्या तीन वर्षांपासून उर्मिला फ्री लान्स साऊंड इंजिनिअर म्हणून काम करते. अवधुत गुप्ते, इटस् मज्जा चॅनेल, बिशाख ज्योती, समीर सप्तीसकर, बुद्धा मुखर्जी यांसारखे अनेक क्लाएंट आहेत, जे विशेषत: तिच्यासोबत काम करतात, एवढेच नाही तर तिचे नाव इतर संगीतकार, गायकांना सुचवतात.