For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘महाराष्ट्राची लोकधारा’ने रसिकांची जिंकली मने

11:07 AM Feb 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘महाराष्ट्राची लोकधारा’ने रसिकांची जिंकली मने
Advertisement

बेळगाव : लोकगीतांतून मनोरंजनासोबतच प्रबोधन करत रसिकांची मने जिंकण्याचा प्रयत्न ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमातून झाला. कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या सदस्यांनी मराठमोळी गाणी, भारुड, अभंग सादर करून आजच्या समाजाला हे संस्कार किती महत्त्वाचे आहेत, हे पटवून दिले. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या बहारदार गीताने कार्यक्रमाची दमदार सुरुवात झाली. विस्मरणात जात असलेला वासुदेव आजच्या समाजाला कसे संस्कार देऊन जातो, हे ‘उधळून आलं आभाळ’ या गीतातून स्पष्ट करण्यात आले. निशा साळोखे यांनी गणेश वंदना सादर केली. विशाल भोरे याने ‘सूर निरागस हो’ हे गीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. समाज सुधारण्यासाठी शौचालय, स्वच्छता, शिक्षण यांचे संस्कार वासुदेवाने दिले.

Advertisement

‘लाजाळू’ या भारुडातून संत एकनाथ महाराजांनी सामाजिक आणि कौटुंबिक प्रश्न सोडविण्यासाठी कसा योग्य मार्ग दाखविला आहे, हे विनोदी अंगाने सादर करण्यात आले. मनीषा डांगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांचे कर्तृत्व पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहे, हे नाटिकेतून सादर केले. ‘मला नवरा नको गं बाई’ याचबरोबर इतर भारुडे विनोदी अंगाने सादर करून त्यातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमाला रसिकांकडून टाळ्यांची दाद मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन यादव यांनी केले. विशेष म्हणजे हे सर्व कलाकार कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. असे असूनही ते ही आपली कला जोपासत असल्याने त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.