For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्राचा तिरंदाजीत सुवर्ण षटकार,

06:47 AM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्राचा तिरंदाजीत सुवर्ण षटकार
Advertisement

नेमबाजीच्या 50 मीटर थ्री पोझीशनमध्ये प्राची, वेदांतचा सुवर्णवेध

Advertisement

वृत्तसंस्था/  भागलपूर (बिहार)

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या सातव्या पर्वात तिरंदाजीमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला बघायला मिळाला. मराठमोळ्या तिरंदाजांनी तब्बल 6 सुवर्ण, 2 रौप्य व 1 कांस्य अशी एकूण 9 पदकांची लयलूट करीत सर्वसाधारण विजेतेपदही पटकाविले. गतवर्षी चेन्नईतील स्पर्धेत महाराष्ट्र या क्रीडा प्रकारात उपविजेता ठरला होता. खेलो इंडियाच्या इतिहासात प्रथमच पदकांचा षटकार महाराष्ट्राने झळकविला आहे. गतवेळी 3 सुवर्णांसह 6 पदके महाराष्ट्राने जिंकली होती. यंदा झारखंड, हरियाणाची मत्तेदारी मोडून महाराष्ट्राने वर्चस्व गाजवित सर्वसाधारण विजेतेपदावर नाव कारले.

Advertisement

मुलांच्या रिकर्व प्रकारात उज्वल ओलेकरने तमिळनाडूच्या स्मारा सर्वेशचा 6-2 सेटने पराभव करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. मेघालयाचा देवराज मोहपात्रा कांस्यपदकाचा मानकरी ठरला. मुलींच्या रिकर्व प्रकारात शर्वरी शेंडे व वैष्णवी पवार या महाराष्ट्राच्या तिरंदाजांमध्येच अंतिम लढत रंगली. शर्वरीने 6-4 सेटने बाजी मारत सुवर्णपदक जिंकले, तर वैष्णवी रौप्यपदकाची मानकरी ठरली. झारखंडच्या तमन्ना वर्मा हिला कांस्यपदक मिळाले. याचबरोबर रिकर्वच्या मिश्र प्रकारातही महाराष्ट्राने सोने लुटले. ज्ञानेश चेराळे व शर्वरी शेंडे या महाराष्ट्रीयन जोडीने सुवर्णपदकाच्या लढतीत हरयाणाच्या दक्ष मलिक व अन्नू या जोडीचा 5-3 सेटने पराभव करीत सुवर्णपदक जिंकले. कोडांडपानी जथ्या व तोडीबोइना वैष्णवी ही आंध्र प्रदेशची जोडी कांस्यपदकाची मानकरी ठरली.

मुलींच्या कपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी तिनही पदके जिंकून निर्भेळ यश मिळविले. प्रीतिका प्रदीप हिने सुवर्णपदकाच्या लढतीत आपलीच राज्यसहकारी तेजल साळवे हिच्यावर एक-एक गुणांसाठी रंगलेल्या पाठशिवणीच्या खेळात 145-144 अशी एका गुणाने बाजी मारली. तेजल रौप्यपदकाची मानकरी ठरली, तर वैदेही जाधव हिने कांस्यपदकाची कमाई केली.

मुलांच्या कपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या मानव जाधवने चुरशीच्या अंतिम लढतीत झारखंडच्या दिवांशू सिंगचा 145-144 असा एका गुणाने पराभव करीत सुवर्णपदक जिंकले. राजस्थानचा देवांश सिंग कांस्यपदकाचा मानकरी ठरला. कपाऊंड मिश्र प्रकारात मानव जाधव व तेजल साळवे या जोडीने महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. महाराष्ट्राच्या जोडीकडून 152-151 असा एका गुणाने पराभव झालेल्या तमिळनाडूच्या मधुरावर्षीनी व आर. मिधुन जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.  अदित्य मित्तल व दृष्टी या दिल्लीच्या जोडीला कांस्यपदक मिळाले. शुभांगी रोकडे-दळवी, सुधीर पाटील, सागर मोरे, त्रिशा संचिती यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी ही खेलो इंडिया युवा स्पर्धेतील मोहिम फत्ते केली.

प्राची गायकवाड, वेदान्त वाघमारेचा ‘सुवर्ण‘वेध

नवी दिल्ली : वेदान्त वाघमारे आणि प्राची गायवाड या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी  खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत नेमबाजीच्या 50 मीटर थ्री पोझीशन रायफल प्रकारात अचूक निशाणा साधताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. खेलो इंडियाच्या इतिहासात 50 मीटर थ्री पोझीशन प्रकारात पदक जिंकणारा वेदान्त वाघमारे हा पहिला नेमबाज ठरला. त्यामुळे महाराष्ट्रासाठी हे ऐतिहासिक पदक ठरले.

नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शुटींग रेंजवर महाराष्ट्रासाठी बुधवारी सोनियाचा दिवस ठरला. नेवाश्यासारख्या (जि. अहिल्यानगर) ग्रामिण भागातील वेदान्त वाघमारेने 50 मीटर थ्री पोझीशन रायफल प्रकारात मुलांच्या विभागात 452.5 गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. हरयाणाचा रोहित कन्यान 451.9 गुणांसह रौप्यपदकाचा मानकरी ठरला. पंजाबच्या अमितोज सिंगला 440.1 गुणांसह कांस्यपदक मिळाले.

मुंबईच्या प्राची गायकवाड हिने 50 मीटर थ्री पोझीशन रायफल प्रकारात मुलींच्या विभागात 458.4 गुणांची कमाई करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. कर्नाटकच्या टिलोट्टमा सेन हिला 455.6 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिचीच राज्यसहकारी अनुष्का ठोकुर हिने 445.7 गुणांसह कांस्यपदक जिंकले.

Advertisement
Tags :

.