महाराष्ट्राच्या अनन्या नायडूला सुवर्ण
राष्ट्रीय 10 मी. एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत मिळविले यश,
वृत्तसंस्था/ भोपाळ
महाराष्ट्राच्या अनन्या नायडूने 67 व्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 10 मी. एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत तिने 252.5 गुण नोंदवले.
अनन्याने रेल्वेच्या अनुभवी मेघना सज्जनारवर केवळ 0.2 गुणांनी मात केली. या प्रकारातील कांस्यपदक तामिळनाडूच्या आर. नर्मदा नितीनने पटकावले. तिने 231.3 गुण नोंदवले. अनन्याने पहिल्या पाच सिंगल शॉट मालिकेत 1.4. गुणांनी आघाडी घेतल्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. 24 शॉट्सच्या अंतिम लढतीत शेवटच्या दोन शॉट्सवेळी अनन्या व मेघना दोघींनीही 20.6 गुण नोंदवल्याने प्रेक्षकांना चमकदार प्रदर्शन पहायला मिळाले.
त्याआधी झालेल्या पात्रता फेरीत अनन्याने 8 वे स्थान मिळविले होते तर तिचीच राज्यवासी आर्या राजेश बोरसेने 633.3 गुण घेत अव्वल स्थान मिळविले. नर्मदा नितीनने पात्रता फेरीत व अंतिम फेरीतही सातत्यपूर्ण प्रदर्शन करीत टॉप तीनमधील स्थान कायम राखले. पात्रता फेरीत तिने 632.9 गुण घेत दुसरे स्थान घेतले होते.
महिलांच्या कनिष्ठ गटातील याच प्रकारच्या नेमबाजीत गौतमी भानोतने 251.5 गुण घेत सुवर्णपदक मिळविले. महाराष्ट्राच्या मयूरी लक्ष्मण पवारने रौप्य मिळविले. या दोघींनी एका टप्यावर 168.0 असे समान गुण मिळविले होते. पण नंतरच्या दोन शॉट्सनंतर गौतमीचे 21.6 तर मयूरीचे 20.5 गुण झाले. हरियाणाच्या दिशा धनकरने 229.9 गुणांसह कांस्यपदक मिळविले.