महाराष्ट्र युवा महिला क्रिकेट संघ विजेता
वृत्तसंस्था / पुणे
2025-26 च्या बीसीसीआयच्या महिलांच्या 19 वर्षांखालील वयोगटातील घेण्यात आलेल्या वनडे क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद महाराष्ट्राच्या युवा महिला संघाने पटकाविले. या स्पर्धेतील झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या युवा महिला संघाने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गुजरातचा 7 गड्यांनी पराभव केला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 223 धावा जमविल्या. गुजरात संघातर्फे दीया वर्धानीने 81 धावांची खेळी केली तर चार्ली सोळंकीने 56 धावा जमविल्या. महाराष्ट्रातर्फे प्रेरणा सावंतने तीन गडी बाद केले. तर ग्रिशा कटारीयाने 4 बळी मिळविले. प्रत्युत्तरादाखल खेळताना महाराष्ट्राने 39.4 षटकांत 3 बाद 226 धावा जमवित हा सामना सात गड्यांनी जिंकला. महाराष्ट्रातर्फे जीया सिंगने 57 तर अक्षया जाधवने नाबाद 54 तसेच भाविका अहीरेने जलद नाबाद 46 धावा झळकविल्या. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या 19 वर्षांखालील वयोगटातील युवा महिला संघाने आपल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर जेतेपद मिळविल्याने या संघाचे रोहीत पवार यांनी अभिनंदन केले आहे.
संक्षिप्त धावफलक: गुजरात सर्वबाद 223 (दीया वर्धानी 81, चार्ली सोळंकी 56, ग्रिशा कटारीया 4 बळी, प्रेरणा सावंत 3 बळी), महाराष्ट्र 39.4 षटकांत 3 बाद 226 (जीया सिंग 57, अक्षया जाधव नाबाद 54, भाविका अहीरे नाबाद 46).