राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांचा डंका
पुरुष गटात रेल्वेची बाजी : महाराष्ट्राच्या महिलांचे 26 वे तर रेल्वेचे 12 वे अजिंक्यपद
वृत्तसंस्था / पुरी (ओडिशा)
57 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने दिमाखदार खेळी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात त्यांनी यजमान ओडिशावर 25-21 असा थरारक विजय मिळवला. दुसरीकडे, पुरुष गटात रेल्वेच्या संघाने गतविजेत्या महाराष्ट्राला 36-28 अशी मात देत बाजी मारली. राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील महाराष्ट्राच्या महिलांचे हे 26 वे तर रेल्वेचे 12 वे अजिंक्यपद ठरले आहे.
पुरी येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत यजमान ओडिशाचा प्रतिकार मोडून काढला. सामन्याच्या मध्यंतराला दोन्ही संघ 10-10 अशा बरोबरीत होते. मात्र, दुसऱ्या डावात महाराष्ट्राने अचूक रणनीती आणि दमदार संरक्षणाच्या जोरावर सामन्यावर वर्चस्व मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले. प्रियांका इंगळे (1.30 मि. संरक्षण), रेश्मा राठोड (1.40 मि. संरक्षण) व अश्विनी शिंदे (1.40 मि. संरक्षण) यांनी पहिल्या डावात तर तन्वी भोसले (3 मि. संरक्षण), संपदा मोरे (1.30 मि. संरक्षण) आणि सानिका चाफे (1.20 मि. संरक्षण) यांनी दुसऱ्या डावात उत्कृष्ट खेळ करत विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
पुरुष गटात रेल्वेची विजयी पताका
पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात रेल्वेने महाराष्ट्रावर 36-28 अशी निर्णायक मात करत अजिंक्यपद आपल्या नावावर केले. मध्यंतराला रेल्वेने 21-12 अशी निर्णायक आघाडी घेत सामन्यावर नियंत्रण मिळवले. दुसऱ्या डावात महाराष्ट्राने 15-15 अशी जोरदार मुसंडी मारली पण रेल्वेने पहिल्या डावात घेतलेली आघाडी महाराष्ट्राच्या पराभवाचे कारण ठरली. रेल्वेकडून अरुण गुणकी (1.20 मि. संरक्षण व 6 गुण), राहुल मंडल (1.40 मि. संरक्षण व 4 गुण), दिलीप खांडवी (6 गुण) व महेश शिंदे (1.40, 1.20 मि. संरक्षण) यांनी अष्टपैलू कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.
महाराष्ट्राच्या संघाकडून लक्ष्मण गवस आणि मिलिंद चावरेकर यांनी प्रत्येकी 1.40 मि. संरक्षण करत विजयासाठी जोरदार प्रयत्न केले होते. पियुष घोलमने 6 गुण मिळवत, तर निहार दुबळे, रुद्र थोपटे आणि सुयश गरगटे यांनी प्रत्येकी 4 गुण मिळवत विजयासाठी केलेले प्रयत्न अपुरे पडले व महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
महिला उपांत्य सामन्यांत महाराष्ट्र आणि ओडिशाचा दबदबा
महिला गटातील उपांत्य सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीचा 26-16 असा पराभव केला, तर ओडिशाने एअरपोर्ट ऑथॉरिटीवर 25-16 असा एक डाव राखून सहज विजय मिळवला. पुरुष गटात महाराष्ट्राने यजमान ओडिशावर 27-25 अशी निसटती मात केली. तर दुस्रया उपांत्य सामन्यात रेल्वेने कोल्हापूरवर 36-32 असा एक डाव राखून 6 गुणांनी विजय मिळवला.
महाराष्ट्राचा विजेता महिला संघ : अश्विनी शिंदे (कर्णधार), संपदा मोरे, प्रीती काळे, संध्या सुरवसे, सुहानी धोत्रे, तन्वी भोसले (धाराशिव), सानिका चाफे, रितिका मगदूम, प्रगती कर्नाळे (सांगली), प्रियांका इंगळे, दिपाली राठोड, ऋतिका राठोड (पुणे), पायल पवार (रत्नागिरी), मनिषा पडेल (नाशिक), रेश्मा राठोड (ठाणे).