For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्राचा जलतरणात अखेरच्या दिवशी पदकांचा षटकार

06:58 AM Feb 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्राचा जलतरणात अखेरच्या दिवशी पदकांचा षटकार
Advertisement

हिर शहा, सानवी देशवाल यांना रौप्य - ऋषभ दास, अदिती हेगडे, ज्योती पाटील यांना कांस्य

Advertisement

वृत्तसंस्था / डेहराडून

महाराष्ट्राच्या जलतरणपटुंनी मंगळवारी अखेरच्या दिवशी पदकांचा षटकार ठोकून 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जलतरण स्पर्धेची यशस्वी सांगता केली. हिर शहा, सानवी देशवाल यांना आपापल्या गटात रौप्यपदक जिंकले. ऋषभ दास, अदिती हेगडे, ज्योती पाटील यांना कांस्य, तर 4 बाय 100 मिटर मिश्र मिडले रीलेतही महाराष्ट्राला कांस्यपदक मिळवले आहे.

Advertisement

पुरुषांच्या 100 मिटर फ्री स्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या हिर शहाने 51.61 सेकंद वेळेसह रौप्य, ऋषभ दासने 51.71 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले. कर्नाटकच्या श्रीहरी नटराजने 50.65 सेकंद वेळेसह सुवर्णपदकावर नाव कोरले. या प्रकारातील महिला गटातही कर्नाटकच्या धीनिधी देसिंधूने 57.34 सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकाविले. महाराष्ट्राच्या अदिती हेगडेने 59.49 सेकंद वेळेसह कांस्य, तर दिल्लीच्या तीतिक्षा रावतने 59.38 सेकंद वेळेसह रौप्यपदक जिंकले. महिलांच्या 100 मिटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात महाराष्ट्राच्या सानवी देशवालने 1 मिनिट 16.37 सेकंद वेळेसह रौप्य तर ज्योती पाटीलने 1 मिनिट 17.36 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले.

4 बाय 100 मिटर मिश्र मिडले रीले शर्यतीत महाराष्ट्राला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. ऋषभ दास, ज्योती पाटील, मिहिर आंब्रे व अदिती हेगडे या चौकडीने 4 मिनिटे 11.09 सेकंद वेळेसह महाराष्ट्राला स्पर्धेतील हे अखेरचे पदक जिंकून दिले. या प्रकारात कर्नाटक व तमिळनाडू या संघांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदकाला गवसणी घातली.

जलतरणाने तारले!

गतवेळी गोव्यात झालेल्या 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने जलतरण स्पर्धेत एकूण 17 पदके जिंकली होती. यामध्ये 5 सुवर्ण, 9 रौप्य व 3 कांस्य पदकांचा समावेश होता. मात्र यंदाच्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या जलतरणपटूनी 6 सुवर्ण, 14 रौप्य व 15 कांस्य अशी एकूण 34 पदकांची लयलूट करीत गतवर्षीच्या तुलनेत कितीतरी सरस कामगिरी केली. गतवेळी महाराष्ट्राने 80 सुवर्ण, 69 रौप्य आणि 79 कांस्य अशी एकूण 228 पदकांची लयलूट करीत पदकतक्त्यात अव्वल स्थान पटकाविले होते. यावेळी योगासनमधील निराशाजनक कामगिरीमुळे महाराष्ट्राचे ‘नंबर वन’चे सिंहासन डळमळीत झाले आहे. या घडीला पदकतक्त्यात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे.  

सायकलिंगमध्ये पूजा दानोळेची हॅट्ट्रीक, श्वेता गुंजाळला कांस्य

रुद्रपूर : कोल्हापूरच्या पूजा दानोळने सायकलिंग क्रीडा प्रकारात पदकांची हॅट्ट्रीक पूर्ण करून दिवस गाजविला. पूजाने तीन किलोमीटर अंतराच्या वैयक्तिक कौशल्य प्रकारात रौप्य पदक पटकाविले. या आधी तिने एक सुवर्णपदक व एक रौप्यपदक पटकावले होते. श्वेता गुंजाळने कांस्यपदक पटकावित महाराष्ट्राच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली.

डोंगरदऱ्यातील रुद्रपूरमधील सायकलिंगमधील 3 किलोमीटर प्रकारात पूजा दानोळेने चार मिनिटे 4.494 सेकंदात अंतर पार करीत सलग तिसऱ्या पदकावर नाव कोरले. ओडिसाच्या स्वस्ति सिंगने हे अंतर चार मिनिटे 3.255 सेकंदात पार करीत सुवर्णपदक जिंकले. पूजाने याआधी वैयक्तिक टाईम ट्रायल या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक तर 60 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले होते. महिलांच्या पाचशे मीटर्स वैयक्तिक कौशल्य क्रीडा प्रकारात श्वेता गुंजाळला कांस्यपदक मिळाले. त्यावेळी तिने हे अंतर 38.085 सेकंदात पार केले. अंदमान व निकोबारची खेळाडू सेलेस्टीना (37.018 सेकंद) व तामिळनाडूची जे श्रीमती (38.070) सेकंद यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक जिंकले.

योगासनात महाराष्ट्राच्या महिलांना सुवर्ण

महाराष्ट्राच्या महिलांनी उत्कृष्ट समन्वय दाखवीत 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धातील योगासनात सांघिक सुवर्णपदकाची बाजी मारली.सुवर्णासह एक रौप्य व एक कांस्यपदकही जिंकले. हेमवतीनंदन बहुगुणा स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या योगासन स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या सुहानी गिरीपुंजे, छकुली सेलोकर, तन्वी रेडीज, रचना अंबुलकर व पूर्वा किनरे यांने 112.13 गुण नोंदवीत सुवर्णपदक जिंकले. या खेळाडूंनी त्यांना दिलेल्या मर्यादित वेळेमध्ये अतिशय विलोभनीय रचना सादर केल्या त्यामुळे परीक्षकांनी त्यांना सर्वोत्तम गुण बहाल केलेच पण प्रेक्षकांनीही त्यांचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.

पुरुषांच्या कलात्मक वैयक्तिक विभागात सोलापूरचा रुपेश सांगे याला रौप्य पदक संपादन केले. अटीतटीच्या लढतीत त्याने देखील अतिशय सुरेख रचना सादर केल्या होत्या अखेर त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले त्याने 117.88 गुणांची कमाई केली. सुहानी हिने पारंपारिक योगासनामध्ये कांस्यपदक पटकावित आपल्या नावावर आणखी एक पदक नोंदविले. नागपूरच्या या खेळाडूने या क्रीडा प्रकारात 60.58 गुणांची नोंद केली. महाराष्ट्राच्या रुपेश सांगे, सागर शितकर, प्रणय कांगळे, सिद्धेश राहते व वैभव देशमुख यांनी योगासनामधील पुरुषांच्या कलात्मक सांघिक प्रकारामध्ये कांस्यपदक जिंकले.

Advertisement
Tags :

.