महाराष्ट्राला मुलींच्या गटात सुवर्ण तर मुलांना रौप्य
मुलांच्या गटात कर्नाटकला सुवर्ण तर मुलींच्या गटात ओडिशाला रौप्य
सोलापूरच्या स्नेहा लामकानेला ‘जानकी‘ तर कर्नाटकच्या बी. विजयला ‘वीर अभिमन्यू‘ पुरस्कार
वृत्तसंस्था/ बेंगळूर
44 व्या कुमार-मुली (ज्युनिअर) नॅशनल खो-खो चॅम्पियनशिप 2025-26 मध्ये खेळाचा अंगावर शहारे आणणारा थरार पाहायला मिळाला. अटीतटीच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या रणरागिणींनी आपल्या कौशल्याच्या जोरावर ओडिशाला नमवून सुवर्णपदक पटकावत अजिंक्यदावर नाव कोरले, तर मुलांच्या अंतिम सामन्यात यजमान कर्नाटकने बलाढ्या महाराष्ट्रावर मात करत सुवर्णावर कब्जा केला. या विजयाने दोन्ही राज्यांच्या खेळाडूंनी भारतीय खो-खो क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
महाराष्ट्राने गेल्या वर्षापर्यंत सलग 10 दुहेरी अजिंक्यपदे मिळवली होती. मुलांच्या गटात सलग 19 आणि एकूण 35 अजिंक्यपदे महाराष्ट्राच्या नावावर होती; मात्र यंदा ही परंपरा खंडित झाली. तरीही महाराष्ट्राच्या मुलींनी सलग 11 वे व एकूण 27 वे अजिंक्यपद जिंकत आपली वर्चस्वाची गाथा अधिक भक्कम केली. या स्पर्धेत सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील स्नेहा लामकाने हिने ‘जानकी पुरस्कार‘ पटकावत स्वत:सह महाराष्ट्राचे नाव उज्वल केले, तर कर्नाटकच्या बी. विजय याला ‘वीर अभिमन्यू पुरस्कार‘ देऊन गौरविण्यात आले.
मुलींचा अंतिम सामना: महाराष्ट्राची विजयाची गुढी
मुलींच्या गटात महाराष्ट्र आणि ओडिशा यांच्यात झालेला सामना अत्यंत थरारक ठरला. मध्यंतरापर्यंत 14-11 अशा निसटत्या फरकाने महाराष्ट्र आघाडीवर होता. तर संपूर्ण वेळेत दोन्ही संघांचा गुणफलक 25-25 असा बरोबरीत होता. त्यानंतर झालेल्या अतिरिक्त डावात महाराष्ट्राने दमदार खेळ करत 44-33 असा 11 गुणांनी दणदणीत विजय मिळवला. संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्राच्या रणरागिणींनी जशी आपली कामगिरी पार पडली तशी अंतिम सामन्यात सुध्दा धमाकेदार ठेवत अजिंक्यपदावर नाव कोरले. ओडिशाच्या मुलींची झुंजार लढत दिली मात्र शेवटी त्यांच्या पदरी निराशाच आली. या विजयानंतर महाराष्ट्राच्या खेळाडू व प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.
मुलांचा थरार, कर्नाटकचा घरच्या मैदानावर विजय
मुलांच्या अंतिम सामन्यात यजमान कर्नाटकने महाराष्ट्रावर 35-30 अशी 5 गुणांनी मात केली. मध्यंतराला कर्नाटकने 23-12 अशी मोठी आघाडी घेतली होती. कर्नाटककडून विजय बी. (1.48, 1.10 मि. संरक्षण व 8 गुण), इब्राहिम (2.10 मि. संरक्षण व 4 गुण), जीवन राठोड (1.50 मि. संरक्षण व 2 गुण), जीवन के. (2.10 मि. संरक्षण) आणि अनिकेत (6 गुण) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. महाराष्ट्राच्या मुलांना जरी अपयश आले तरी त्यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद ठरली.
वैयक्तिक पुरस्कारांचे मानकरी ठरले चमकते तारे
स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. मुलींच्या गटात महाराष्ट्राची स्नेहा लामकाने ‘जानकी पुरस्कारा‘ची मानकरी ठरली, तर दीक्षा काटेकर (महाराष्ट्र) हिने ‘सर्वोत्कृष्ट आक्रमक‘ आणि ओडिशाच्या अर्चना प्रधान हिने ‘सर्वोत्कृष्ट संरक्षक’ पुरस्कार पटकावला. मुलांच्या गटात कर्नाटकच्या विजय बी. याला ‘वीर अभिमन्यू पुरस्कार‘ मिळाला. महाराष्ट्राचा राज जाधव ‘सर्वोत्कृष्ट आक्रमक’ आणि कर्नाटकचा प्रज्वल वाय. ‘सर्वोत्कृष्ट संरक्षक’ ठरला.