मत्स्य संवर्धन महाराष्ट्राकडून, लाभ परप्रांतीयांना
महाराष्ट्र शासनाने यावर्षी प्रथमच मत्स्यसाठ्यांचे संवर्धन आणि मत्स्योत्पादन वाढीस अधिक चालना देण्याच्या उद्देशाने 76 दिवसांची आश्वासक पावसाळी मासेमारी बंदी अंमलात आणली. 16 ऑगस्टला महाराष्ट्रातील मच्छीमारांना अरबी समुद्र मासेमारीसाठी खुला झाला. परंतु वादळी हवामानामुळे हा 16 तारखेचा मुहुर्त हुकला. निसर्गानेही अधिकचे 8 ते 10 दिवस मच्छीमारांना रोखून धरले. या साऱ्याचा परिणाम म्हणून हंगामाच्या सुरुवातीला बांगडा, सुरमई, कोकरी आदी महत्त्वाच्या माशांची पैदास अन् वाढ चांगली राहिली. पण दुर्दैवाने यावर्षीदेखील ‘मत्स्य संवर्धन महाराष्ट्राचे अन् लूट मात्र परप्रांतीयांकडून’ हे चित्र बदललेले नाही.
कोकणचे सुपुत्र नीतेश राणे यांनी मत्स्य विकास मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मत्स्य विभागात काही महत्त्वाचे निर्णय नक्कीच झाले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने कारभार करण्यात मत्स्य विभाग राज्यात अव्वल ठरला. याचदरम्यान मत्स्य विभागाला कृषीचा दर्जा देण्यात आला. महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्षाकरिता दोनशेपेक्षा जास्त पदनिर्मितीला हिरवा कंदिल मिळाला. हवाई गस्तीसाठी ड्रोन प्रणाली कार्यरत झाली. अवैध एलईडी पर्ससीन आणि परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाईचे प्रमाण वाढले. त्याचबरोबर नीतेश राणे यांना 76 दिवसांच्या मत्स्य बंदी कालावधीसाठी राज्यातील सर्वच मच्छीमारांकडून प्रोत्साहन मिळाले. त्यासाठी मंत्री म्हणून राणे आणि राज्यातील सर्व मच्छीमारांचे कौतुक व्हायलाच हवे. परंतु 76 दिवसांच्या बंदीस होकार देत असताना राज्यातील मच्छीमारांनी मंत्री राणे यांच्यासमोर आपल्या दोन प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या. बंदी आम्ही पाळणार अन् मासळीची लूट स्थानिक अवैध पर्ससीन किंवा परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स करणार असे होता नये.
गस्ती नौका 17 ऑगस्टपासूनच कार्यान्वित झाल्यात पाहिजेत, ही मच्छीमारांची पहिली मागणी होती. तर दुसरी मागणी बंदी कालावधीत मच्छीमारांना राज्य सरकारने सानुग्रह अनुदान द्यावे, अशी होती. त्यापैकी बंदी कालावधी अनुदानासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मच्छीमारांना पावसाळी मासेमारी बंदी अनुदान देण्याबाबतची वाच्यता स्वत: नीतेश राणे यांनी केली आहे.
अवैध पर्ससीन आणि परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सचे अतिक्रमण रोखण्यात महाराष्ट्र सरकार पुन्हा एकदा अपयशी ठरले आहे. एकामागोमाग 40 ते 50 च्या संख्येने जाळे ओढत चाललेले परराज्यातील हायस्पीडट्रॉलर्स भरदिवसा सिंधुदुर्ग ते रत्नागिरीच्या किनाऱ्यावरून सध्या स्पष्ट दिसतात. सुरमई पकडण्यासाठी ‘न्हैय’ नावाची गिलनेट पद्धतीची पारंपरिक मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या सिंधुदुर्गातील मच्छीमारांची जाळी या ट्रॉलर्सनी तोडली आहेत. ‘न्हैय’ मासेमारीची वेळ सूर्यास्त ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत असते. परंतु परराज्यातील ट्रॉलर्स रात्रीच्यावेळीसुद्धा महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत धुडगूस घालून दहशत निर्माण करतात. त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना आपली जाळी लवकर ओढावी लागतात. परिणामत: त्यांचा एक दिवसाचा इंधन खर्च व श्रम वाया जातात. त्यात परत जाळी ओढायला उशीर झाला तर हजारो रुपयांची जाळी गमावून हताशपणे किनाऱ्यावर परतण्याची वेळ त्यांच्यावर येते.
काही मच्छीमार तर याच त्रासाला कंटाळून मासेमारीस जाणेच बंद करतात. दुर्दैवाने यंदाचा हंगामही या सर्व परिस्थितीस अपवाद राहिलेला नाही. रत्नागिरीतील हर्णै बंदरातील एका स्थानिक नौकेस गुजरातमधील एका ट्रॉलरने ठोकरल्याची घटना मत्स्य हंगामाच्या सुरुवातीलाच घडली होती. स्वत:च्या हक्काच्या सागरी हद्दीतच मासेमारीस जाण्यास महाराष्ट्रातील मच्छीमारांना असुरक्षितता वाटत असेल तर सरकारचे हे अपयशच म्हणावे लागेल. हे अपयश धुवून टाकण्याचे आव्हान नीतेश राणेंसमोर कायम आहे. मत्स्य हंगामाच्या सुरुवातीला मत्स्य विभागाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अवैध स्थानिक पर्ससीन तसेच कर्नाटकातील एका मोठ्या गिलनेटधारक नौकेवर कारवाई करून पारंपरिक मच्छीमारांसाठी संरक्षित असलेल्या सागरी क्षेत्रातील घुसखोरी कमी करण्याचा प्रयत्न नक्की केला आहे. त्याचा लाभही स्थानिक मच्छीमारांना होताना दिसतोय. परंतु परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सपर्यंत मात्र मत्स्य विभागाची गस्ती नौका अद्याप पोहोचलेली नाही. त्यांच्यावर जेव्हा मोठी कारवाई केली जाईल तेव्हाच स्थानिकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल, अशी भावना मच्छीमारांमध्ये आहे.
दुसरीकडे मत्स्य विभाग किंवा अन्य सरकारी यंत्रणेच्या कारवाईवरचा विश्वास उडालेल्या स्थानिक मच्छीमारांनी यंदादेखील मत्स्य हंगामाच्या सुरुवातीलाच ‘डमी फिशिंग’चा अवलंब करून अवैध पर्ससीन नौकांना दणका द्यायला सुरुवात केली आहे. 12 सागरी मैलाच्या आत पर्ससीन नौका मासेमारी करताना दिसताच ‘डमी फिशिंग’चा अवलंब करणारे मच्छीमार त्यांना भर समुद्रात घेरून त्यांनी अवैधरित्या पकडलेल्या मासळीची लूट करीत आहेत. त्यांच्या या कृतीतून अप्रत्यक्षपणे प्रशासकीय व्यवस्थेवरील त्यांचा उडालेला विश्वास आणि नाराजी प्रकट होतेय. गस्ती नौका हवीच कशाला, ती काय कामाची आहे. गस्ती नौकेने कारवाई केली तरी पर्ससीन, एलईडी किंवा हायस्पीड ट्रॉलर्सचे अतिक्रमण थांबलेय का? असे सवाल उपस्थित करून ते एकप्रकारे व्यवस्थेवरील आपला राग व्यक्त करताना दिसतात. मत्स्य विभागाच्या गस्तीपेक्षा त्यांना ‘डमी फिशिंग’ खूप प्रभावी व किफायतीशीर वाटतेय. यात आपला श्रम, वेळ आणि इंधनाचीही चांगली बचत होते, अशा प्रकारची मानसिकता मच्छीमारांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता हे ‘योग्य आहे की अयोग्य’ याचे उत्तर सरकारनेच दिलेले बरे. कारण उद्या यातून भर समुद्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सरकारचा अकार्यक्षमपणाच कुठेतरी जबाबदार असणार आहे. सरकारला अवैध पर्ससीन मासेमारीचा प्रश्न सोडवता न आल्यानेच त्यावर ‘डमी फिशिंग’चा पर्याय पुढे आला आहे. सिंधुदुर्गात पारंपरिक मच्छीमार आपल्या न्याय मागण्यांसाठी सातत्याने आंदोलनाची भूमिका घेत असतात. परंतु, यंदा गस्ती नौका कार्यान्वित होण्यास उशीर होऊनसुद्धा ते गस्ती नौकेसाठी मत्स्य कार्यालयाचे दरवाजे ठोठावताना दिसले नाहीत. प्रशासकीय व्यवस्थेवरचा त्यांचा विश्वास उडत चाललाय हाच याचा अर्थ होतो.
महेंद्र पराडकर
