लालपरीच्या दरवाढीचा सीमाभागाला फटका
15 टक्के दरवाढ : आंतरराज्य प्रवास महागला
बेळगाव : कर्नाटक पाठोपाठ महाराष्ट्र परिवहन मंडळानेही बसच्या तिकिट दरात 15 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे सीमाभागातील प्रवाशांना लालपरीच्या वाढत्या दराचा फटका सोसावा लागणार आहे. विशेषत: बेळगाव सीमाभागात कर्नाटकबरोबर महाराष्ट्राच्या लालपरीने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या प्रवाशांना आता बससाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने जानेवारी महिन्यात 15 टक्के तिकीट दरात वाढ केली होती. त्यापाठोपाठ फेब्रुवारी प्रारंभीच महाराष्ट्र परिवहन मंडळाने तिकीट दरात 15 टक्क्यांची वाढ केली आहे. कर्नाटकात महिलांचा शक्ती योजनेंतर्गत मोफत प्रवास सुरू आहे. तर महाराष्ट्रात महिलांना निम्मे तिकीट दर आकारले जात आहेत. या दरवाढीने दोन्ही राज्यांच्या महामंडळांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र बससेवेत सुधारणा होणार का? हेच पाहावे लागणार आहे.
वाढत्या इंधन दरवाढीमुळे राज्य परिवहन मंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीमाभागातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना अधिक तिकीट दराचा फटका सहन करावा लागत आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बेळगाव जिल्ह्यात महाराष्ट्राच्या लालपरी येत असतात, या बसेसमध्ये आता पूर्वीपेक्षा जादा तिकीट आकारले जाणार आहे. मागील महिन्यात कर्नाटक परिवहनने तिकीट दरात वाढ केल्याने आंतरराज्य प्रवास करणारे प्रवासी महाराष्ट्राच्या लालपरीला पसंती देत होते. मात्र आता महाराष्ट्र परिवहननेही तिकीट दरात वाढ केल्याने आंतरराज्य प्रवासासाठी दोन्ही राज्यांच्या प्रवाशांना जादा तिकीट मोजावे लागणार आहे. जीवनावश्यक वस्तू इंधन, गॅस या पाठोपाठ आता बस तिकीट दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्यांना महागाईच्या झळा अधिक सोसाव्या लागत आहेत.