‘महाराष्ट्रातील निकाल आमच्यासाठी धडा’
काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांचे प्रतिपादन : विधानसभा निवडणुकीबाबत मंथन
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेस आता आत्मपरीक्षण करत आहे. शुक्रवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निवडणूक निकालातून आपण ताबडतोब धडा घेऊन संघटनात्मक पातळीवर आपला सर्व कमकुवतपणा आणि उणिवा सुधारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. विधानसभा निवडणुकांचे हे निकाल आपल्यासाठी एक संदेश आहेत, असे ते म्हणाले. या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि वायनाडच्या लोकसभा खासदार प्रियांका गांधीही उपस्थित होत्या.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेस पक्षाने शुक्रवारी ‘सीडब्ल्यूसी’ची बैठक बोलावली होती. यामध्ये पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी भारताने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) ऐवजी पारंपरिक बॅलेट पेपरकडे परतावे, असे मत नोंदवले. यासोबतच पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नाही असे सांगत आता निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असणे अत्यंत गरजेचे आहे. जात जनगणना आणि आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याबाबत काँग्रेसने जशी स्पष्ट भूमिका घेतली आहे, तशीच संबल प्रकरणासारख्या अन्य मुद्यांवरही ठोस भूमिका घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
संघटनात्मक मजबुतीवर भर
कार्यकारिणी बैठकीनंतर के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाने निवडणुकीतील कामगिरी आणि संघटनात्मक मुद्यांबाबत अंतर्गत समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समित्या विभाग आणि जिल्हा स्तरावर पक्षाच्या स्थितीचे मूल्यांकन करतील. यासोबतच आगामी निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती आणि संघटनात्मक तयारी मजबूत करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचा संकल्प करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वादग्रस्त वक्तव्यांमुळे फटका
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीतील पराभव हा पक्षाला मोठा धक्का असल्याचे सांगत खर्गे यांनी आता जबाबदारी निश्चित करण्याबरोबरच कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे स्पष्ट केले. परस्पर ऐक्याचा अभाव आणि एकमेकांविरोधातील वक्तव्ये यामुळे आपले खूप नुकसान होते, असा दावाही त्यांनी बैठकीत केला. तसेच आपण पक्षशिस्तीचे काटेकोरपणे पालन करणे आणि एकसंध राहणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिल्लीत काँग्रेसचे ‘एकला चलो’
काँग्रेस सीडब्ल्यूसीच्या बैठकीत दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकांवरही चर्चा झाली. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका 2025 मध्ये होणार आहेत. या निवडणुकीत आम आदमी पार्टीसोबत युती होणार नाही. काँग्रेस पक्ष सर्व 70 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले.