For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विजेतेपदाच्या हॅट्ट्रिकसाठी महाराष्ट्र सज्ज

06:47 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
विजेतेपदाच्या हॅट्ट्रिकसाठी महाराष्ट्र सज्ज
Advertisement

महाराष्ट्र-हरयाणामध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई

Advertisement

वृत्तसंस्था/ पटना

खेलो इंडिया युथ गेम्सच्या सातव्या पर्वात सर्वसाधारण विजेतेपदाच्या हॅटट्रिकसाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. स्पर्धेत पुन्हा एकदा महाराष्ट्र-हरयाणामध्ये वर्चस्वाची लढाई रंगणार आहे. रविवारी तिरंदाजीच्या कम्पाऊंडमधील रँकिंग राऊंडमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी अव्वल स्थानावर झेप घेत स्पर्धेत दमदार प्रारंभ केला.

Advertisement

स्पर्धेतील 27 पैकी 26 क्रीडाप्रकारांमध्ये महाराष्ट्राचा बलाढ्या संघ मैदानात उतरला आहे. 437 खेळाडूंसह 128 प्रशिक्षक, व्यवस्थापक असे एकूण 565 जणांचे पथक सहभागी होणार आहे. महिला खेळाडूंची संख्या सर्वाधिक 238 असून 177 मुले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. दिल्लीत 10 मे पासून होण्राया जिम्नॉस्टिक्स क्रीडाप्रकारातही महाराष्ट्राचा बोलबाला असणार आहे.

हॅटट्रिकसह विक्रमी पाचवे विजेतेपदासाठी मराठमोळे क्रीडापटू उद्घाटनाच्या दिवसापासून झुंज देत आहेत. भागलपूर येथील आर्चरी रेंजवर गतविजेत्या महाराष्ट्राने खेलो इंडिया यूथ गेम्सच्या सातव्या पर्वाचीही आपल्या लौकिकास साजेशी सुरूवात केली. बुलढाण्याच्या तेजल साळवे हिने तिरंदाजीच्या कम्पाऊंड प्रकारात सर्वाधिक 697 गुणांचा वेध घेत रँकिंग राऊंडमध्ये प्रथम स्थान प्राप्त केले. पाठोपाठ. वैदेही जाधवने 692 गुणांची कमाई करीत दुसरा, तर प्रितिका हिने 690 गुणांसह तिसरा क्रमांक निश्चित केला. मुलांच्या रिकर्व प्रकारात महाराष्ट्राच्या ज्ञानेश चेराळेने 651 गुणांसह तिसरे स्थान संपादून पदकाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे.

महाराष्ट्र-हरियाणात रंगणार चुरस

जलतरण, जिम्नॉस्टिक्स व अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्र पदकांच्या शर्यतीत पहिल्या दिवसापासून पदकतक्यात आघाडीवर असणार आहे. कुस्ती, मुष्टियुध्द खेळात हरियाणी घोडदौड दिसेल. यंदाच्या स्पर्धेत महाराष्ट्र-हरयाणा यांच्यात कोण बाजी मारणार याकडे तमाम क्रीडाप्रेमींच्या नजरा असतील. उत्तराखंडातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकविजेते खेळाडू पार्थ माने, शांभवी क्षीरसागर आर्चरीचे प्रितिका प्रदिप, वैष्णवी पवार हे वरिष्ठ गटातील पदकवीर युवा खेलो इंडियात सोनरी यशासाठी आतुर झाले आहेत.

2018 पासून दिल्ली येथून खेलो इंडिया स्पर्धेला प्रारंभ झाला. पहिल्या स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले होते. 2019 साली पुणे, 2020 साली आसाम स्पर्धेत महाराष्ट्राने विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2022 साली मध्य प्रदेशमधील स्पर्धेत विजेतेपद महाराष्ट्राने खेचून आणले. गतवर्षी 2023 मध्ये तामिळनाडूत महाराष्ट्र पुन्हा चॅम्पियन ठरला. गत तामिळनाडू स्पर्धेत 57 सुवर्ण, 48 रौप्य व 53 कांस्य अशी एकूण 158 पदके मिळवून  महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे निर्विवाद वर्चस्व गाजविले होते. मध्यप्रदेश पाठोपाठ तामिळनाडूत सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले होते. आतापर्यंत झालेल्या सहा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने चार वेळा, तर हरयाणाने दोन वेळा या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले आहे. गतविजेता महाराष्ट्र व हरयाणा या दोन तुल्यबळ संघांमध्ये पुन्हा एकदा वर्चस्वाची लढाई असेल. यावेळीही महाराष्ट्राकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात आहे.

Advertisement
Tags :

.