For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

महाराष्ट्राच्या राजकारणातील 'बंटी' बुरुज

03:23 PM Oct 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्राच्या राजकारणातील  बंटी  बुरुज
Advertisement

अमोल सरीकर

Advertisement

कोल्हापूरची माती ही वैचारिक मंथन, लाल मातीतील कुस्तीचा खेळआणि रांगड्या पण धोरणी राजकारणासाठी राज्यभर ओळखली जाते. या जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांत ज्या एका नेत्याने आपल्या संघटन कौशल्याच्या आणि मुत्सद्दीपणाच्या बळावर आपले अढळ स्थान निर्माण केले, ते नाव म्हणजे आमदार सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील. आजच्या घडीला जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष विविध राजनैतिक वळणांवरून जात आहे, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचा आश्वासक चेहरा म्हणून सतेज पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते राज्याच्या विधान परिषदेपर्यंत आणि सहकाराच्या महामेरू असलेल्या 'गोकुळ' पासून ते जनआंदोलनांपर्यंत सतेज पाटील यांनी आपली एक वेगळीच राजकीय शैली विकसित केली आहे.

नुकत्याच झालेल्या गोकुळ दुभ संघाच्या निवडणुकीत महायुतीचे तीन मंत्री, दोन खासदार आणि १० आमदारांच्या चक्रव्यूहाला भेदत सतेज पाटील यांनी मिळवलेला विजय हा राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे. 'गोकुळ' दूध संघाची निवडणूक ही केवळ एका सहकारी संस्थेची निवडणूक नव्हती, तर ती पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वर्चस्वाची अंतिम लढाई होती. ४,१८५ कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असणारा हा संघ कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेतकरी आणि ठरावधारकाशी जोडलेला आहे. या निवडणुकीत सतेज पाटील यांच्याविरोधात महायुतीने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. प्रचारादरम्यान साम, दाम, दंड, भेद या सर्व मार्गाचा वापर झाला. मात्र, गोकुळचा बाप शेतकरी हाय आणि गोकुळ वाचवा या पाटलांच्या हाकेला ठरावधारकांनी साथ दिली.

Advertisement

काँग्रेसचा भक्कम आधारस्तंभ
राजकारणात येणे आणि टिकून राहणे यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो. सतेज पाटील यांनी केवळ राजकारणात प्रवेश केला नाही, तर कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार, शिक्षण आणि राजकारणाच्या पटलावर स्वतःचा असा एक स्वतंत्र वारसा उभा केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात जेव्हा-जेव्हा काँग्रेस पक्षावर प्रतिकूल परिस्थिती ओढवली, तेव्हा पक्षाला ताकदीने उभे करण्याचे काम सतेज पाटील यांनी केले. केवळ एका मतदारसंघापुरते किंवा कोल्हापूर शहरापुरते मर्यादित न राहता, त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेसचे जाळे पसरवले. आजच्या घडीला पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचा आवाज बुलंद ठेवण्याचे आणि पक्षाला ऊर्जा देण्याचे काम ते करत आहेत.

'एकाकी पण धडाडीची टक्कर
जिल्हा परिषद आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सतेज पाटील यांनी दाखवलेली आक्रमकता आणि धडाडी कौतुकास्पद ठरली आहे. महानगरपालिका निवडणुकीत पक्षाची बाजू भक्कम करताना त्यांनी अनेकदा प्रस्थापितांच्या विरोधात थेट संघर्ष केला. स्थानिक पातळीवरील विरोधकांचे आव्हान परतून लावण्यासाठी त्यांनी बूथ लेव्हलपर्यंत यंत्रणा राबवली. ही लढाई सोपी नव्हती; कारण एका बाजूला सत्तेची ताकद असताना दुसऱ्या बाजूला केवळ जनआधार आणि कार्यकर्त्यांची फौज घेऊन दिलेली ही टक्कर सतेज पाटील यांच्या संघर्षात्मक वृत्तीची साक्ष देणारी ठरली. त्यांनी अनेकदा राजकीय समीकरणे बदलून टाकली आणि विरोधकांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडले. पराभवापेक्षा लढण्याची जिद्द मोठी असते, हे त्यांनी दाखवून दिले.

बंटी नावाचा ब्रँड

सतेज पाटील केवळ निवडणुका जिंकण्यासाठी राजकारण करत नाहीत, तर राजकीय संघटन कसे बांधायचे आणि प्रसंगी टोकदार संघर्ष कसा करायचा याचे तंत्र त्यांना अवगत आहे. सध्याच्या बदलत्या राजकीय वातावरणात, जिथे पक्षांतरे आणि तडजोडीचे राजकारण सर्वसाधारण झाले आहे, तिथे सतेज पाटील यांनी कोल्हापुरात विरोधी विचारसरणीशी देताना दाखवलेला लढाऊ बाणा काँग्रेस पक्षासाठी मोलाचा ठरत आहे. महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, शक्तीपीठ महामार्गाचा लढा असो वा गोकुळमधील स्वबळाचा नारा असो, सतेज पाटील यांनी प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांची ही जुळवाजुळव, संघर्षाची तयारी आणि जनमानसातील पकड आगामी काळात त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठ्या भूमिकेत घेऊन जाणारी ठरेल, यात शंका नाही. 'बंटी' नावाचा हा राजकीय बँड कोल्हापूरच्या मातीत अधिक मजबूत होत असून, आगामी काळातील प्रत्येक राजकीय उलथापालथीमध्ये सतेज पाटील हा केंद्रबिंदू असणार आहे.

'जनआंदोलनांचे नेतृत्व '

राजकारणी केवळ निवडणुकीपुरता विचार करतात, हा समज सतेज पाटील यांनी वेळोवेळी खोटा ठरवला आहे. जेव्हा सामान्य शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण जनतेच्या हितावर गदा आणणारे प्रकल्प लादले जातात, तेव्हा सतेज पाटील पक्षाच्या चौकटीबाहेर येऊन थेट जनतेच्या पाठीशी उभे राहिलेले दिसतात. याचा उत्तम अनुभव शक्तीपीठ महामार्गा' च्या मुद्यावर आला. हा महामार्ग कोल्हापुरातून जाता कामा नये, यासाठी त्यांनी विधिमंडळापासून ते रस्त्यापर्यंत तीव्र संघर्ष पुकारला. सत्तेतील नेत्यांच्या दबावाला न जुमानता शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी सरकारविरोधात रणशिंग फुंकले. या भूमिकेमुळे सतेज पाटील हे केवळ 'राजकीय नेते' न राहता जनतेचे 'लोकनेते' म्हणून अधिक ठळकपणे पुढे आले.

Advertisement
Tags :

.