खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद
57 सुवर्णांसह 158 पदकांची कमाई : यजमान तामिळनाडूला दुसरे तर हरियाणाला तिसरे स्थान
वृत्तसंस्था/ चेन्नई
गतविजेत्या महाराष्ट्राने यंदाही खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे निर्विवाद वर्चस्व गाजवित सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले. तब्बल 57 सुवर्ण, 48 रौप्य व 53 कांस्य अशी एकूण 158 पदकांची लयलूट करीत महाराष्ट्राने आम्हाला ‘नंबर वन’ का म्हणतात हे पुन्हा दाखवून दिले. आतापर्यंत झालेल्या सहा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने 4 वेळा सर्वसाधारण विजेतेपद पटकाविण्याचा पराक्रम केला असून, हरियाणा संघाने दोन वेळा हा बहुमान मिळविलेला आहे.
यजमान तामिळनाडू संघाने घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा उठवित 38 सुवर्ण, 21 रौप्य, 39 कांस्य अशी एकूण 98 पदके जिंकून उपविजेतेपद पटकाविले. हरियाणा संघाला पदक तालिकेत तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागश्र. त्यांनी 35 सुवर्ण, 22 रौप्य व 46 कांस्य अशी एकूण 103 पदकांची कमाई केली.
महाराष्ट्राला जलतरणात सर्वाधिक पदके
महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी 11 सुवर्ण, 10 रौप्य व 6 कांस्य अशी एकूण 27 पदके जिंकून पदक तालिकेमध्ये मोठा वाटा उचलला. त्या खालोखाल जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला नऊ सुवर्णपदकांसह 17 पदके मिळाली, तर कुस्तीमध्ये महाराष्ट्राला चार सुवर्णपदकांसह 14 पदकांची कमाई झाली. अॅथलेटिक्समध्ये 12, तर वेटलिफ्टिंगमध्ये 13 पदके महाराष्ट्राने जिंकली. योगासनामध्ये महाराष्ट्राला 11 पदके मिळाली.
जलतरणामध्ये दोन्ही गटात सांघिक विजेतेपद
जलतरणामध्ये महाराष्ट्राने मुले व मुली या दोन्ही गटात सांघिक विजेतेपद पटकाविले. शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या ऋषभ दास याने यंदाच्या स्पर्धेतील 50 मीटर्स फ्रीस्टाईल शर्यत 24.22 सेकंदात पार केली आणि या स्पर्धेतील यंदाचे चौथे सुवर्णपदक जिंकले. पाठोपाठ त्याने महाराष्ट्राला रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकून आपल्या सुवर्णपदकांची संख्या पाच केली. तो नवी मुंबई येथील खेळाडू असून आजपर्यंत त्याने राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत. ऋषभ याने अथर्व संकपाळ, रोनक सावंत व सलील भागवत यांच्या साथीत चार बाय शंभर मीटर्स फ्रीस्टाईल रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. ही शर्यत त्यांनी तीन मिनिटे 35.52 सेकंदात पूर्ण केली.
मुलींच्या गटात निर्मयी अंबेटकरने 200 मीटर्स बटरफ्लाय शर्यतीत कांस्यपदक जिंकताना दोन मिनिटे 26.91 सेकंद वेळ नोंदवली. तिची सहकारी अलिफिया धनसुरा ने 50 मीटर्स फ्रीस्टाईल शर्यत 27.07 सेकंदात पार केली आणि सुवर्णपदक जिंकले. हिबा चौगुले हिने 50 मीटर्स शर्यतीत रुपेरी कामगिरी करताना 34.94 सेकंद वेळ नोंदविली.
महाराष्ट्रच्या मुले व मुलींच्या खो खो संघास दुहेरी मुकुट
खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुले व मुलींच्या खो खो संघाने विजेतेपद पटकावित दुहेरी मुकुट संपादिला. मुलांच्या गटात दिल्ली तर मुलींच्या गटात ओडिसाला नमविले. मदुराईतील एसडीएटी जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राने ओरिसाचा 33-24 असे 9 गुण व 3.30 मिनिटे राखून पराभव केला. महाराष्ट्रच्या सौंदर्या व सुहानीने आपल्या धारदार आक्रमणात 8 गडी टिपले. अश्विनी व प्रीतीने 2.40 व 2.10 मिनिटे संरक्षणाची बाजू सांभाळली. मुलांच्या गटात महाराष्ट्राने दिल्लीस 40-30 असे हरविले. महाराष्ट्राच्या रामचंद्रने 7 गडी बाद करीत 1 मिनिटे पळती केली. संरक्षणात गणेशने 2.10, अजयने 2.06 व चेतनने 2.10 मिनिटे खेळी केली.