For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीमाप्रश्नासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेणे गरजेचे

07:33 AM Jan 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
सीमाप्रश्नासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेणे गरजेचे
Advertisement

खानापुरात म. ए. समितीच्यावतीने हुतात्म्यांना अभिवादन : सीमाप्रश्न सोडवणूक हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली ठरेल : मान्यवरांकडून प्रतिक्रिया

Advertisement

खानापूर : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आता रस्त्यावरची शेवटची लढाई सुरू करणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्रात तीव्र लढा उभा करणे गरजेचे आहे. सीमालढा जरी न्यायप्र्रविष्ट असला तरी मराठी अस्मितेच्या जपणुकीसाठी सर्व मतभेद विसरुन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र येऊन लढा तीव्र करणे गरजेचे आहे. सीमाप्रश्नासाठी महाराष्ट्र सरकारवर दबाव आणण्यासाठी जे काय करता येईल ते आपण सर्वांनी मिळून करुया. सीमाप्रश्न सोडवून घेणे हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे उद्गार अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी कै. नागाप्पा होसूरकर हुतात्मा स्मारकासमोर हुतात्म्यांना अभिवादन करताना काढले. प्रारंभी हुतात्मा नागाप्पा होसूरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सीमाप्रश्नासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, मराठी अस्मितेसाठी आपण सर्वांनी एकत्र राहणे गरजेचे आहे. न्यायालयीन लढाईबरोबरच रस्त्यावरची लढाईही गरजेची आहे. यासाठी सीमाप्रश्न सुटेपर्यंत भगव्याशी इमान राखत लढाई तीव्र केली पाहिजे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीनंतरच हुतात्म्यांचे बलिदान सार्थकी लागणार आहे. यासाठी प्रश्न सोडवून घेण्यासाठी जे काही करता येईल, ते आपण सर्वांनी मिळून करू. मारुती परमेकर म्हणाले, महाराष्ट्र सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घेणे अत्यंत गरजेचे आहे. 68 वर्षाचा कालावधी लोटला. मात्र सीमाप्रश्नाचा निकाल लागू शकला नाही. महाराष्ट्र सरकारने आता हा प्रश्न आपला समजून याबाबत केंद्राकडे दबाव टाकणे गरजेचे आहे. यासाठी सीमाभागातील अन्यायग्रस्त मराठी भाषिकांनी आता महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्याची गरज निर्माण झाली आहे. मुरलीधर पाटील म्हणाले, विधानसभेतील पराभव विसरुन सर्वांनी भविष्यातील निवडणुकात समितीचा भगवा फडकवण्यासाठी आपण सर्वांनी हुतात्म्यांचे स्मरण ठेवून एकदिलाने पुढील वाटचाल करुया, हीच खरी श्रद्धांजली ठरेल.

Advertisement

गोपाळ पाटील म्हणाले, सीमाभागातील मराठी संवर्धनासाठी समितीच्या माध्यमातून काम होऊ शकते. यासाठी सर्वांनी मतभेद विसरुन समितीच्या झेंड्याखाली एकत्र राहून सीमाप्रश्न सुटेपर्यंत लढ्याशी प्रामाणिक राहणे हीच श्रद्धांजली. जगन्नाथ बिरजे म्हणाले, हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ नये, यासाठी आज हुतात्मादिनी सर्वांनी हुतात्म्यांचे स्मरण करून एकत्र राहणे गरजेचे आहे. अरुण देसाई यांनी, विशाल गोमांतकाच्या प्रस्तावाचा केंद्राने आणि महाराष्ट्राने विचार करावा,असे सांगितले. सीमासत्याग्रही पुंडलिक चव्हाण म्हणाले, हुतात्म्यादिनी आपण शपथबद्ध झाले पाहिजे, एकी तरुणानी करण्यापेक्षा भगव्या झेंड्याशी आणि मराठीशी प्रामाणिक राहून समितीच्या भगव्यासाठी एकत्र राहणे काळाची गरज आहे. मायबोलीच्या  रक्षणासाठी आपण सर्वांनी स्वार्थ बाजूला सारुन कोणत्याही पदाची अपेक्षा न करता समितीच्या झेंड्याखाली एकत्र राहूया. यावेळी प्रकाश चव्हाण, यशवंत बिर्जे, निरंजन सरदेसाई, पांडुरंग सावंत, अनंत पाटील, विलास बेळगावकर, शिवा सुळकर, डी. एम. भोसले, रामचंद्र पाटील, शिवाजी पाटील, मधूकर पाटील, रुक्माण्णा झुंजवाडकर, अमृत शेलार, तुळजाराम गुरव, मारुती गुरव, प्रल्हाद घाडी, राजाराम देसाई, म्हात्रू धबाले, शामराव पाटील, ईश्वर बोबाटे, प्रल्हाद मादार, पुंडलिक पाटील, रणजीत पाटील, कृष्णा कुंभार, मऱ्याप्पा पाटील, संतोष पाटील, प्रविण पाटील, लक्ष्मण पाटील, वसंत नावलकर, जयराम देसाई, पुंडलिक कारलगेकर, रमेश धबाले, एम. एम. खांबले, शिवानंद सुळकर, महमद बेलगामी, शरद पाटील, रविंद्र शिंदे, शंकर पाटील, मुकुंद पाटील, नितीन देसाई, गोपाळ हेब्बाळकर यासह समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.