For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्राला विजयासाठी 104 धावांची गरज

06:00 AM Feb 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्राला विजयासाठी 104 धावांची गरज
Advertisement

वृत्तसंस्था /सोलापूर

Advertisement

2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या अ इलाईट गटातील सामन्यात शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर महाराष्ट्राला सौराष्ट्रवर निर्णायक विजय मिळवण्यासाठी 104 धावांची गरज असून दिवसअखेर महाराष्ट्राने दुसऱ्या डावात 5 बाद 104 जमवल्या आहेत. सौराष्ट्रकडून निर्णायक विजयासाठी महाराष्ट्राला 208 धावांचे आव्हान देण्यात आले होते पण सौराष्ट्राच्या भेदक गोलंदाजीसमोर महाराष्ट्राने दुसऱ्या डावात आपले 5 गडी गमवले आहेत. या सामन्यात सौराष्ट्रचा पहिला डाव 202 धावावर आटोपल्यानंतर महाराष्ट्राचा पहिला डाव 159 धावात संपुष्टात आला. सौराष्ट्रने महाराष्ट्रवर पहिल्या डावात 43 धावांची आघाडी घेतली. या सामन्यातील खेळाच्या पहिल्या दोन दिवसात गोलंदाजांनी आपली चमक दाखवली. खेळाच्या पहिल्या दिवशी एकूण 17 गडी बाद झाले. तर शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी 8 गडी बाद झाले.

महाराष्ट्रने 7 बाद 116 या धावसंख्येवरून दुसऱ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला आणि त्यांचे उर्वरित 3 गडी 43 धावांची भर घालत तंबूत परतले. कौशल तांबेने 37, अंकित बामणेने 34, धिलाँने 21 धावा केल्या. सौराष्ट्रच्या धर्मेंद्रसिंग जडेजाने 61 धावात 4, दोडियाने 45 धावात 3 तर पार्थ बुथने 25 धावात 2 गडी बाद केले. 43 धावांची आघाडी घेतल्यानंतर सौराष्ट्रने आपल्या दुसऱ्या डावात 164 धावांपर्यंत मजल मारली. वासवदाने 39, चिराग जेनीने 43, कर्णधार उनादकटने 45 धावा केल्या. महाराष्ट्रातर्फे हितेश वळूंज सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला त्याने 70 धावात 8 गडी बाद केले. महाराष्ट्राला निर्णायक विजयासाठी 208 धावांची जरुरी असताना त्यांचा दुसरा डावही कोलमडला. सौराष्ट्रच्या भेदक गोलंदाजीसमोर महाराष्ट्रने दुसऱ्या डावात दिवसअखेर 27 षटकात 5 बाद 104 धावा जमवल्या. सौराष्ट्रच्या दोडीया आणि पार्थ बुथ यांनी प्रत्येकी 2 तर जडेजाने एक गडी बाद केला. अंकित बावणेने 25, विशांत मोरेने 21 तांबेने 16, भोसलेने 16, काजेने 9 धावा केल्या. म्हात्रे 11 धावावर खेळत आहे. या सामन्यात रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही संघांना विजयाची समान संधी असल्याचे जाणवते.

Advertisement

संक्षिप्त धावफलक : सौराष्ट्र प. डाव 202, महाराष्ट्र प. डाव 159, सौराष्ट्र दु.  डाव 164, महाराष्ट्र दु. डाव 5 बाद 104.

Advertisement
Tags :

.