For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्रातून मान्सूनची माघार सुरू; पुढील काही दिवसांत राज्यभरातून परतीचा प्रवास पूर्ण होण्याची शक्यता

06:25 PM Oct 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार सुरू  पुढील काही दिवसांत राज्यभरातून परतीचा प्रवास पूर्ण होण्याची शक्यता
Advertisement

मुंबई : राज्यात यंदाच्या मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांतून नैऋत्य मोसमी वारे माघारी फिरू लागले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत राज्यातील आणखी भागांतून मान्सूनची माघार होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.

Advertisement

मान्सून माघारी फिरण्यासाठी सलग काही दिवस पावसाची अनुपस्थिती, वातावरणातील आर्द्रतेत घट आणि वाऱ्यांच्या दिशेत बदल यांसारखे निकष पाहिले जातात. या परिस्थिती अनुकूल झाल्यानंतर हवामान विभागाकडून मान्सूनच्या माघारीची घोषणा केली जाते.

मुंबईतही मान्सूनच्या माघारीच्या पार्श्वभूमीवर हवामानात बदल जाणवत आहे. मुंबईत ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच तापमानात वाढ झाली असून, मान्सूनच्या संक्रमणामुळे समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या पद्धतीत बदल होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Advertisement

दरम्यान, 1 ते 7 ऑक्टोबरदरम्यान कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाच्या अंदाजात व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मान्सूनची माघार सुरू झाली असली तरी काही भागांत तुरळक पावसाच्या सरी पडण्याची शक्यता कायम आहे.

राज्यात पावसाची तूट

यंदाच्या जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण विभागनिहाय कमी राहिले. उपलब्ध आकडेवारीनुसार, राज्यात सरासरीपेक्षा सुमारे 19 टक्के कमी पाऊस नोंदवला गेला. मराठवाड्यात सुमारे 40 टक्के, विदर्भात 23 टक्के, कोकणात 14 टक्के आणि मध्य महाराष्ट्रात 11 टक्के तूट नोंदवण्यात आली.

देशपातळीवरही यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहिला. जून ते सप्टेंबरदरम्यान देशात 759.4 मिमी पाऊस झाला, तर दीर्घकालीन सरासरी 868.6 मिमी आहे. त्यामुळे देशभरात सुमारे 13 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली.

मान्सूनच्या माघारीनंतर राज्यात कोरड्या हवामानाचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेती, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि रब्बी हंगामातील पेरण्यांसाठी आगामी हवामान महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement

.