महाराष्ट्राने सीमाप्रश्न सोडविण्याची संधी तीनदा दवडली!
पुणे येथील ‘लेखक-वाचक संवाद’ सत्रात डॉ. किरण ठाकुर यांची खंत : सीमाभाग राजकीय महत्त्वाकांक्षेचा ठरला बळी
पुणे : भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वानुसार सीमाभागाचा प्रश्न सुटला असता; परंतु महाराष्ट्र सीमावासियांच्या बाजूने भक्कमपणे उभा राहिला नाही. महाराष्ट्रातील नेत्यांनी तीनवेळा सीमाप्रश्न सोडविण्याची संधी दवडली, अशी खंत ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक आणि ‘लोकमान्य मल्टिपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांनी येथे व्यक्त केली. ‘पुणे पुस्तक महोत्सव’, नीलकंठ प्रकाशन आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’ यांच्यावतीने आयोजित ‘लेखक वाचक संवाद’ सत्रात ते बोलत होते. यातील 25 वे पुष्प डॉ. ठाकुर आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे यांनी गुंफले. प्रा. डॉ. गणेश राऊत यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
यात ‘लोकमान्य कल्चरल फाउंडेशन’ प्रस्तुत आणि ‘गंगोत्री होम्स’ सहप्रायोजक असणाऱ्या ‘मायमराठी कलासंगम’च्या पूर्वरंगात रंगलेल्या गप्पांचा आनंद वाचकांनी घेतला. डॉ. ठाकुर म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या जडणघडणीत बेळगाव, कारवार, बिदर-भालकीचेही मोठे योगदान आहे. तथापि, महाराष्ट्र व महाराष्ट्रातील नेत्यांना याचा विसर पडला. सीमावासियांच्या पाठीशी खरेतर महाराष्ट्राने भक्कपणे उभे राहणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. महाराष्ट्रातील नेत्यांना तीनवेळा सीमाप्रश्न सोडविण्याची संधी मिळाली होती. मात्र, त्यांनी ती दवडली. सीमाभाग त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचा बळी ठरला.’ कर्नाटक सरकारच्या कन्नडसक्तीविरोधात अनेक आंदोलने होऊनही ही सक्ती हटलेली नाही. सीमाभागात मराठी मुलांना वंचित ठेवले जात आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
आपली जडण घडण, सीमाभागातील मराठीजन, तरुण भारत, सहकार क्षेत्र, ‘लोकमान्य सोसायटी’ची वाटचाल यांसारख्या विषयांना डॉ. ठाकुर यांनी आपल्या भाषणात स्पर्श केला. ते म्हणाले, सहकार क्षेत्रात प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो. सामान्य माणसे कष्टाने एकेक पैसा जमा करतात. त्यांना चांगला परतावा मिळण्यासह समाजकार्याच्या उद्देशाने ‘लोकमान्य सोसायटी’ची मुहूर्तमेढ रोवली. महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. मराठी प्रसारासाठीही आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत. सांस्कृतिक क्षेत्रात ‘लोकमान्य कल्चरल फाउंडेशन’ कार्यरत असून, लवकरच याला विद्यापीठाचे स्वरूप देऊ, असेही त्यांनी नमूद केले.
मराठीचा आग्रह हवा : सुनील भंडगे
मराठी भाषेचा आग्रह आपण धरला पाहिजे. आपली मराठी भाषा ही पुढील पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी वाचन संस्कृती ऊजविणेही महत्त्वाचे आहे. ही अभिजात मराठी भाषा जगविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी वैविध्यपूर्ण प्रयोगही व्हावेत, अशी अपेक्षा सुनील भंडगे यांनी व्यक्त केली. ‘नीलकंठ प्रकाशन’चे मुकुल मारणे व‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक श्रीधर लोणी यांच्याहस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.