काळ्या दिनी महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात येण्यास प्रवेशबंदी
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : शांतताभंग होण्याचे दिले कारण
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने काळादिन पाळला जातो. यामध्ये भाग घेण्यासाठी महाराष्ट्रातील नेते बेळगावला येतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्रातील शिवसेनेच्या नेत्यांना बेळगावात प्रवेशबंदी घातली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शुक्रवारी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी बेळगावला येणारे महाराष्ट्रातील नेते नेहमी प्रशासनाच्या डोळ्यात खुपतात. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती राखण्याचे निमित्त सांगत या नेत्यांना प्रवेशबंदी केली जात आहे. 1 नोव्हेंबर रोजी सीमालढ्यात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना प्रवेशबंदी करावी, असा प्रस्ताव जिल्हा पोलीसप्रमुखांनी पाठविला आहे. या प्रस्तावावर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले आहे.
शिवसेना (उद्धव गट) नेते विजय शामराव देवणे, संजय पवार, सुनील मोदी, सुनील शिंत्रे, विशाल देवकुळे, मनजित माने या सहा नेत्यांच्या नावांचा बंदी आदेशात उल्लेख करीत त्यांच्यासोबत येणारे शिवसैनिक व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते-कार्यकर्त्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
काळ्यादिनाच्या फेरीत सहभागी होण्यासाठी शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते निपाणीमार्गे बेळगावात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या नेत्यांच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे भाषिक तणाव वाढण्याची व सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना कर्नाटकात प्रवेशबंदी लागू करावी, असा प्रस्ताव जिल्हा पोलीसप्रमुखांनी पाठवला होता.
