महाराष्ट्र का आदमी...कोल्हापूरसे आया हूँ...! कळंबा येथील सर्जेराव खोपडे आयोध्येत दाखल
श्रीराम मूती प्रतिष्ठापना सोहळ्याचे होणार सक्षीदार; आयोध्यावासियांच्या पाहूणचाराने भारावले आजोबा
कोल्हापूर प्रतिनिधी
पांढरी विजार, पांढरा शर्ट अन्य डोक्यावर गांधी टोपी असा महाराष्ट्राचा पारंपरीक पेहराव अन् कोल्हापूरच रांगड व्यक्तीमत्व असलेले कळंबा येथील 74 वर्षीय सर्जेराव उर्फ तुकाराम खोपडे हे आजोबा रामजन्मभुमी आयोध्येत दाखल झाले आहेत. त्यांचा हा पेहराव पाहून आयोध्येतील लोक त्यांना महाराष्ट्र से आये हो... असे विचारत असताना ते महाराष्ट्र का आदमी, कोल्हापूरसे आया हूँ असे अभिमानाने सांगत आहेत. तसेच या सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या रामभक्तांचा आयोध्यावासियांकडून होत असलेल्या पाहूणचार पाहून खोपडे आजोबा भारावून गेले आहे. येथील वातावरण पाहता आयोध्येत देशातील विविधतेतील एकतेचे दर्शन होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर शहरालगत असणारे कळंबा गावातील सर्जेराव खोपडे हे दिनांक 12 जानेवारी रोजी कोल्हापूरातून एकटेचे आयोध्येच्या दिशेने मार्गस्थ झाले. चार दिवसांचा प्रवास करत ते 16 जानेवारी रोजी आयोध्येत दाखल झाले. गेली चार दिवस ते आयोध्येत असून तेथील सांस्कृतीक, भक्तीमय वातावरणात तल्लीन झाले आहेत. दररोज राममंदिरात जावून बाहेरुन रामलल्लाचे दर्शन घेत असल्याचे खोपडे यांनी सांगितले.
निवासाची मोफत सुविधा
आयोध्या येथे ठिकठिकाणी ग्रीनहाऊस सारखे तंबू उभारले आहेत. येथे आयोध्येत आलेल्या नागरिकांना राहण्याची मोफत सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. येथे एक लहान बेड, गादी, उशी, दोन ते तीन ब्लँकेट अशी सुविधा देण्यात आली आहे. येथे राहण्याची सुविधा पूर्णपणे मोफत पुरविण्यात आली आहे.
हर एक प्रकारचे खाद्यपदार्थ
संपूर्ण देशभरातून लोक आयोध्येत आले आहेत. राममंदिर लगत असणाऱ्या राजा दशरथ वाड्यात सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत मोफत जेवणाची सुविधा केली आहे. त्याबरोबर विविध जाती-धर्माच्या लोकांनीही त्यांच्या पद्धतीच्या जेवणाचे स्टॉल रस्त्यांलगत उभारले असून त्यांच्याकडून रामभक्तांना मोफत अन्नदान केले आहे. आयोध्येत सकाळी आठ ते रात्री आठ असे बारा तास दूध, चहा, कॉफीसह विविध खाद्यपदार्थांचे मोफत वाटप सुरु आहे. हर एक प्रकारचे खाद्यपदार्थ येथे उपलब्ध असल्याचे खोपडे यांनी सांगितले.
कडाक्याची थंडी, कपडे सुकण्यास तीन दिवस
आयोध्येत सध्या कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे येथील नागरिकांकडून शाल व ब्लँकेटचेही मोफत वितरण केले आहे. आयोध्येत गेल्यापासुन गेली चार दिवस सूर्य, चंद्र, तारे यांचे दर्शन झालेले नाही. तसेच येथे धुतलेली कपडे सुकण्यास तीन दिवसांचा कालावधी लागत असल्याचेही खोपडे यांनी सांगितले.
आयोध्येत देशभरातील संस्कृतीचे दर्शन
देशभरातील लोक आयोध्येत आले असून ते आपआपल्या परीने येथे सेवा देत आहेत. येथे दिसून येणारे विविध पेहराव्यातील लोक, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, विविध प्रकारच्या भाषा हे सर्व चित्र पाहून सध्या आयोध्येते देशातील विविध संस्कृतीचे दर्शन होत आहे. तसेच जात-पात बाजूला ठेवून ऐकमेकांना केले जाणारे सहकार्य पाहता देशातील विविधतेतील एकतेचेही येथे दर्शन घडत असून येथील वातावरण पाहता मनस्वी आनंद होत असल्याचे खोपडे यांनी सांगितले.
सोहळ्याचा साक्षीदार, अविस्मरणीय क्षण
आयोध्येत होत असलेल्या राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळा अनुभवण्यास मिळणार आहे. त्यामुळे या सोहळ्याचा एक प्रकारे साक्षीदार होणार आहे. आयुष्यातील हा एक अविस्मरणीय क्षण आहे.
- सर्जेराव खोपडे, ज्येष्ठ नागरिक.