महाराष्ट्र, कर्नाटक, विदर्भ थेट उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/ मुंबई, जयपूर
2024-25 च्या विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, विदर्भ आणि बडोदा या संघांनी थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रेल्वेने महाराष्ट्राचा 32 धावांनी पराभव केला. या पराभवानंतरही महाराष्ट्र संघाने आपल्या ब गटात आघाडीचे स्थान राखल्याने त्यानी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या सामन्यात रेल्वेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 284 धावा केल्या. त्यानंतर महाराष्ट्राचा डाव 252 धावांत संपुष्टात आला. रेल्वे संघातील साहेब युवराज सिंग आणि सुरज आहुजा यांनी दमदार अर्धशतके झळकाविली. रेल्वेच्या पुर्णांक त्यागीने 57 धावांत 5 तर राज चौधरीने 43 धावांत 3 गडी बाद केले. ब गटात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर तर राजस्थानने दुसरे स्थान मिळविले. राजस्थान संघाला सिक्किमकडून 6 धावांनी अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सिक्किमने 50 षटकात 5 बाद 275 धावा जमविल्या. त्यानंतर राजस्थानचा डाव 269 धावांवर आटोपला.
क गटातील सामन्यात रविवारी कर्नाटक आणि पंजाब यांनी अनुक्रमे नागालँड व पुडूचेरी यांचा पराभव केला. हे सामने अहमदाबादमध्ये खेळविले गेले. या गटात मुंबई संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागल्याने ते बाद फेरीसाठी पात्र ठरु शकले नाहीत. या स्पर्धेत पाच विविध गटातील पहिले दोन संघ बाद फेरीत प्रवेश करतील. कर्नाटकाने रविवारच्या सामन्यात नागालँडचा 9 गड्यांनी पराभव केला. कर्नाटकाला नागालँडकडून विजयासाठी 206 धावांचे आव्हान मिळाले होते. कर्नाटकाने 1 बाद 207 धावा जमवित हा सामना 9 गड्यांनी जिंकला. मयांक अगरवालने 119 चेंडूत नाबाद 116 धावांची शतकी खेळी केली. या सामन्यात कर्नाटकाच्या श्रेयस गोपालने 24 धावांत 4 गडी बाद केले.
पंजाबने पुडूचेरीचा 167 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 50 षटकात 9 बाद 338 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर पुडूचेरीचा डाव 171 धावात आटोपला. पंजाबच्या डावामध्ये 5 फलंदाजांनी अर्धशतके झळकाविली. पंजाबच्या अर्शदिप सिंगने 19 धावांत 4 तर रघु शर्माने 37 धावांत 4 गडी बाद केले. क गटात तिसऱ्या स्थानावर असलेल्या मुंबईने सौराष्ट्रचा 5 गड्यांनी पराभव केला. सौराष्ट्रने मुंबईला 290 धावांचे आव्हान दिले होते.
ड गटातील सामन्यात विदर्भने मिझोरामचा 10 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात मिझोरामचा डाव 72 धावांत आटोपला. त्यानंतर विदर्भने बिनबाद 73 धावा जमवित हा सामना 10 गड्यांनी जिंकला. या गटातील अन्य एका सामन्यात तामिळनाडूने छत्तीसगडचा 73 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना तामिळनाडूने 301 धावा केल्या. बाबा इंद्रजीत आणि विजयशंकर यांनी अर्धशतके झळकाविली. छत्तीसगडचा डाव 228 धावांत आटोपला.
बडोदा संघाने दिल्लीचा पाच गड्यांनी पराभव केला. या सामन्यात दिल्लीचा डाव 180 धावांत आटोपला. त्यानंतर बडोदा संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात विजयाचे उद्दिष्ट गाठले. अन्य एका सामन्यात मध्य प्रदेशने बंगालचा 6 गड्यांनी पराभव केला. दरम्यान या गटात बंगालने दुसरे स्थान मिळविल्याने हा संघ बाद फेरीसाठी पात्र ठरला.
झारखंडने अ गटातील सामन्यात गोवा संघाचा 31 धावांनी पराभव केला. झारखंडने 50 षटकात 7 बाद 320 धावा जमविल्या. उत्कर्ष सिंगने 120 चेंडूत 102 धावा झळकाविल्या. तर गोवा संघातर्फे दर्शन मिसाळचे दीडशतक वाया गेले. गोवा संघाने 50 षटकात 9 बाद 289 धावा केल्या. या गटात गुजरात आणि हरियाणा हे दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले आहेत. झारखंडला या गटात तिसरे स्थान मिळाले. रविवारच्या सामन्यात गुजरातने ओडीशाचा 100 धावांनी पराभव केला. या सामन्यात गुजरातचा डाव 252 धावांत आटोपला. त्यानंतर ओडीशाने 152 धावांपर्यंत मजल मारली. हरियाणा संघाने मणिपूरचा 6 गड्यांनी पराभव केला.