कोल्हापुरात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा समन्वय बैठक
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर चर्चा
कोल्हापूर :
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आंतरराज्य सीमा समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत आंतरराज्य तपासणी नाके, जिह्यातील प्रलंबित अजामीन वॉरंट, भेटवस्तू साठा व वाटप, अवैध रोख रक्कम वाहतूक आणि मसल पावर गुंडाच्या माहितीची सीमेलगत असणाऱ्या कर्नाटक राज्यातील जिह्यातील पोलिसांच्याबरोबर देवाण घेवाण करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी होते.
बैठकीला बेळगाव परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विकास कुमार विकास, बेळगाव शहर पोलीस आयुक्त मार्टीन, कलबुर्गीचे पोलीस उपमहानिरीक्षक अजय कुमार हिलोरे, बेळगाव (ग्रामीण) पोलीस अधीक्षक डॉ. भिमाशंकर गुळदे, विजापूरचे पोलीस अधीक्षक प्रसन्न देसाई, बिदरचे पोलीस अधीक्षक प्रदीप गुट्टी, कलबुर्गी पोलीस अधीक्षक अद्दरु श्रीनिवासलु यांच्याबरोबर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, सोलापूर (ग्रामीण) पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सांगलीचे अपर पोलीस अधीक्षक रितु खोकर व कोल्हापूरच्या अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई हे हजर होते.
बैठकीमध्ये आंतरराज्य सीमा तपासणी नाके कामगिरीचा आढावा घेण्यात आला. तसेच अजामीनपात्र वॉरंट, पाहीजे व फरारी आरोपी, सीमा भागातील गुन्हेगारी टोळ्या आणि गुन्हेगार यांची माहिती एकमेकांना प्रदान करणे. अजामीनपात्र वॉरंट बजावणीस प्राधान्य देणे. त्यामुळे निवडणूक कालावधीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या गुन्हेगारांवर निर्बंध ठेवता येईल, यावर चर्चा करण्यात आली.
मतदानाच्या 72 तासापूर्वी सीमावर्ती भागातील पोरस पॉईंट सील करणे, मतदान व मतमोजणी दिवशी कर्नाटक भागातील सीमावर्ती जिह्यातील दाऊ दुकाने बंद ठेवून, मद्य कोरडा दिवस घोषित करण्याविषयी. आगामी काळात सीमा तपासणी नाक्यांवर अधिक लक्ष केंद्रित करुन, अवैध गांजा, दारु, पैसे (भेटवस्तु) यांच्यावर प्रभावी करवाई करण्याबाबत अधिक भर देण्याविषयी चर्चा केली.