For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्र, झारखंड निवडणुका घोषित

06:59 AM Oct 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्र  झारखंड निवडणुका घोषित
Advertisement

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान तर झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला मतदान

Advertisement

वृत्तसंस्था / .नवी दिल्ली

महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सर्व 288 विधानसभा जागांवर एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर झारखंडच्या 81 जागांसाठी 13 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. अनेक राज्यांमधील विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकाही याच कालावधीत होणार आहेत. 23 नोव्हेंबरला सर्व मतदारसंघांमधील मतगणना केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम स्पष्ट केला. या व्यतिरिक्त विविध राज्यांमध्ये विधानसभांसाठी अनेक पोटनिवडणुकाही होणार आहेत. केरळमधील वायनाड आणि महाराष्ट्रातील नांदेड मतदारसंघांमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या सर्व निवडणुकांचा कार्यक्रम राजीव कुमार यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केला.

महाराष्ट्राचा निवडणूक कार्यक्रम

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. या सर्व जागांवर 20 नोव्हेंबरला मतदान घेतले जाणार आहे. महाराष्ट्रासाठी मतदानाचा हा एकच टप्पा ठेवण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक 29 ऑक्टोबर असून अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिनांक 4 नोव्हेंबर हा आहे. महाराष्ट्रात 1 लाख 183 मतदान केंद्रे असतील. मतदारांची संख्या 9 कोटी 63 लाखांहून काहीशी अधिक आहे. पुरुष मतदारांची संख्या महिला मतदारांहून अधिक आहे.

झारखंडमध्ये दोन टप्पे

झारखंड विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली असून तेथे दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. या राज्यात विधानसभेच्या 81 जागा आहेत. त्यांच्यापैकी 43 मतदारसंघांमध्ये 13 नोव्हेंबरला, तर उर्वरित 38 मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. झारखंडमध्ये 29 हजार 562 मतदान केंद्रे असतील. या राज्यात मतदारांची संख्या 2 कोटी 62 लाखांहून अधिक आहे.

विविध राज्यांमध्ये पोटनिवडणुका

महाराष्ट्र आणि झारखंड वगळता अन्य राज्यांमध्ये विधानसभांच्या पोटनिवडणुका होणार आहेत. अशा एकंदर 47 जागा आहेत. त्यांच्यात उत्तर प्रदेशातील 10 विधानसभा मतदारसंघांचाही समावेश आहे. मात्र, उत्तर प्रदेशात 9 मतदारसंघांमध्येच पोटनिवडणुका होणार असून मिल्कीपूर मतदारसंघात निवडणूक होणार नाही. या मतदारसंघासंबंधी न्यायालयात याचिका सादर करण्यात आल्याने येथील पोटनिवडणूक लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तराखंड राज्यातील केदारनाथ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान 13 नोव्हेंबरला होणार असून इतर 46 मतदारसंघांमध्ये ते 20 नोव्हेंबरला घेतले जाईल, अशी माहिती प्रमुख निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.

लोकसभेच्या दोन पोटनिवणुका

केरळमधील वायनाड आणि महाराष्ट्रातील नांदेड या दोन लोकसभा मतदारसंघांमध्येही पोटनिवडणुका होत आहेत. वायनाड येथील पोटनिवडणूक 13 नोव्हेंबरला, तर नांदेड येथील पोटनिवडणूक 20 नोव्हेंबरला होत आहे. लोकसभेच्या एकंदर स्थानांची संख्या 543 आहे. सध्या 541 स्थाने भरलेली असून 2 रिक्त आहेत. या पोटनिवडणुका झाल्यानंतर त्याही भरल्या जाणार आहेत.

मतदानयंत्रांवरील आरोप धादांत खोटे

हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीचा परिणाम समोर आल्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये घोटाळा असल्याचा आरोप केला होता. मंगळवारच्या पत्रकार परिषदेत प्रमुख केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हे सर्व आरोप धादांत खोटे असल्याचे स्पष्ट केले. यंत्रे 100 टक्के निर्दोष असल्याचे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.

महाराष्ट्रात अशी होईल निवडणूक...

ड निवडणुकीची राजपत्र अधिसूचना 22 ऑक्टोबर 2024

ड उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिनांक 29 ऑक्टोबर 2024

ड उमेदवारी अर्जांची छाननी 30 ऑक्टोबर 2024

ड उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिनांक 4 नोव्हेंबर 2024

ड मतदानाचा दिनांक 20 नोव्हेंबर 2024

ड मतगणनेचा दिनांक 23 नोव्हेंबर 2024

महत्वाचा बॉक्स

महाराष्ट्रातील मतदार

ड विधानसभेची एकंदर स्थाने 288

ड मतदारांची एकंदर संख्या 9 कोटी 63 लाखांहून अधिक

ड महिला मतदारांची संख्या 4 कोटी 66 लाखांहून अधिक

ड पुरुष मतदारांची संख्या 4 कोटी 97 लाखांहून अधिक

ड तरुण मतदारांची संख्या 1 कोटी 85 लाखांहून अधिक

ड नवमतदारांची संख्या 20 लाख 93 हजारांहून अधिक

महत्वाचा बॉक्स

महाराष्ट्रातील मतदान केंद्रे

ड एकंदर मतदान केंद्रे 1 लाख 183

ड शहरी मतदान केंद्रे 42 हजार 604

ड ग्रामीण मतदान केंद्रे 57 हजार 582

ड केवळ महिला अधिकारी मतदान केंद्रे 388

ड केवळ नव अधिकाऱ्यांची मतदान केंद्रे 299

आदर्श आचारसंहिता लागू

विधानसभा निवडणुकांची घोषणा होताक्षणीच सर्व संबंधित राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित सरकारांना कोणत्याही लोकानुनयात्मक घोषणा करता येणार नाहीत. मात्र, ज्या घोषणा पूर्वीपासून लागू आहेत, त्यांचे क्रियान्वयन, तसेच दैनंदिन प्रशासकीय कामे करण्याची अनुमती आचारसंहिता काळात देण्यात येते.

Advertisement
Tags :

.