विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र भारताचे ‘गेटवे’
झ्युरिक :
‘महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो ते करून दाखवतो. त्यामुळेच जागतिक उद्योगजगत आणि गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढत आहे,’ असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे केले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह शिष्टमंडळासमवेत दाखल झाले असून, यावेळी महाराष्ट्र पॅव्हेलियन हे उद्योग आणि गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे ‘गेटवे ऑफ इंडिया’ आहे. देशातील अन्य राज्यांशी सकारात्मक स्पर्धा असली, तरी गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारतासाठी मजबूत इकोसिस्टम उभी केली असून, त्याच आधारावर यंदाही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तिसरी मुंबई उभारण्याच्यादिशेने वाटचाल
राज्याच्या सर्व भौगोलिक भागांमध्ये समतोल विकास साधण्यासाठी 10 ते 12 विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणण्यावर भर दिला जात आहे. तिसरी मुंबई उभारण्याच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू असून, त्यासाठी मोठ्या गुंतवणुकीचे संकेत मिळत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्राकडे गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ‘मेन्यू कार्ड’ तयार आहे,“ असेही त्यांनी नमूद केले.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही उद्योगजगतासाठी एक प्रकारची ‘चावडी’ असल्याचे सांगत, येथे महाराष्ट्राची क्षमता, पायाभूत सुविधा आणि धोरणे जागतिक स्तरावर प्रभावीपणे मांडली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत महाराष्ट्राने सुमारे 60 ते 65 सामंजस्य करार प्रत्यक्षात उतरवले असून, करारांचे रूपांतर प्रमाण देशात सर्वाधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वोत्तम गुंतवणूक स्थळ
एमएसएमई, स्टार्टअप्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर्स, हरित ऊर्जा, एज्यु-सिटी आणि इनोव्हेशन सिटीसारख्या उपक्रमांमधून सुमारे 35 लाख उच्च वेतनाच्या नोक्रया निर्माण होतील. उद्योगांसाठी ‘झिरो टॉलरन्स’ कायदा-सुव्यवस्था धोरणामुळे महाराष्ट्र हे सुरक्षित, विश्वासार्ह आणि भविष्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक स्थळ असल्याचा ठाम विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
39 टक्के एफडीआय महाराष्ट्रात येतो
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राने गेल्या दशकात सरासरी 10 टक्क्यांहून अधिक विकासदर कायम राखला आहे. 2030 पर्यंत राज्याला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट असून, त्या दिशेने नियोजनबद्ध पावले उचलली जात आहेत. देशात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी तब्बल 39 टक्के एफडीआय महाराष्ट्रात येतो, हे राज्याच्या विश्वासार्हतेचे द्योतक आहे.