महाराष्ट्राचा सहा राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान
नवी दिल्ली येथे राष्ट्रपती दौप्रदी मूर्मू यांच्या हस्ते वितरण
यशदा पुणे तर्फे उपमहासंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी स्वीकारला पुरस्कार
कोल्हापूर
भारत सरकारच्या पंचायत राज्य विभागाच्या वतीने राबविलेल्या नवरत्न संकल्पनेची महाराष्ट्र राज्यात प्रभावी अंमलबजावणी केल्याने महाराष्ट्राचा सहा राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशदा पुणे या संस्थेला मिळाला. यशदा पुणेतर्फे राज्य ग्रामीण विकास संस्थेचे उपमहासंचालक तथा संचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी पुरस्कार स्वीकारला. नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले.
पंचायतीचा शाश्वत विकास करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या पंचायत राज विभागाच्या वतीने नवरत्न संकल्पना राबवली आहे. संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गतवर्षीपासून पंचायत राज संस्थासाठी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सुरू केले आहे. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 3 ग्रामपंचायत, 1 पंचायत समिती व 1 पंचायत क्षमता निर्माण संस्था यांनी हा पुरस्कार मिळविला. ग्रामपंचायत, पंचायत समिती व संस्थांना राजीव रंजन सिंह पंचायती राज मंत्री भारत सरकार, एस. पी. सिंह बघेल राज्यमंत्री पंचायत राज विभाग भारत सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीदिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत, पंचायत समिती, संस्था पुढीलप्रमाणे :
पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार- यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशदा पुणे.
नानाजी देशमुख सर्वोत्तम सतत विकास पुरस्कार -सर्व श्रेष्ठ ग्रामपंचायत- देशात प्रथम क्रमांक-ग्रामपंचायत मान्याचीवाडी ता.पाटण जि.सातारा
नानाजी देशमुख सर्वोत्तम सतत विकास पुरस्कार-सर्व श्रेष्ठ पंचायत समिती देशात तृतीय क्रमांक- ब्लॉक तिरोरा जिल्हा गोंदिया
ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार-देशात प्रथम क्रमांक - ग्रामपंचायत मान्याचीवाडी ता.पाटण जि.सातारा.
कार्बन न्यूट्रल पंचायत विशेष पुरस्कार- देशात प्रथम क्रमांक-
ग्रामपंचायत बेला ता. भंडारा जि. भंडारा
दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार अंतर्गत स्वच्छ व हरित गाव या थिममध्ये देशात तृतीय क्रमांक- ग्रामपंचायत मोडाळे ता. इगतपुरी जि. नाशिक