महाराष्ट्र गारठला नीचांकी 5.5 अंश सेल्सिअस
पुणे / प्रतिनिधी :
उत्तरेकडील राज्यात कडाक्याची थंडी पडल्याने राज्यात गेले दोन दिवस थंडीची लाट पसरली असून, सोमवारी अहिल्यानगर येथे हंगामातील सर्वात कमी 5.5 अंश सेल्सिअसइतके किमान तापमान नोंदविण्यात आले. दरम्यान, उद्यापासून राज्यातील थंडीची लाट ओसरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हिमालयातील अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर या भागातील किमान तापमान उण्यामध्ये पोहचले आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशातील काही भागात तीव्र थंडीची लाट कायम आहे. याशिवाय गुजरात, दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यात थंडीच्या लाटेचा प्रभाव आहे. परिणामी राज्यात थंडीची लाट पसरली आहे. यात पुणे,अहिल्यानगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, गोंदिया आदी जिह्यात हाडे गोठविणारी थंडी पडली आहे. किमान तापमानाने हंगामातील रेकॉर्ड मोडला आहे. सोमवारी 5.5 एवढ्या किमान तापमानाची अहिल्यानगर येथे नोंद झाली.
दक्षिण मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र हुडहुडी कमी होणार दरम्यान, दक्षिण मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या दोन दिवसात याची तीव्रता वाढणार असून, हे क्षेत्र तामिळनाडूकडे सरकणार आहे. यामुळे पूर्व व्रायांचा प्रभाव वाढणार असून, उत्तरी थंड व्रायास अटकाव होईल. तसेच पूर्व वारे आर्द्रता वाढवणार असल्याने राज्याच्या दक्षिण भागात ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. परिणामी थंडीची लाट ओसरणार आहे.
पुण्यात हुडहुडी
पुणे तसेच अहिल्यानगर मधील अनेक शहरात किमान तापमान गेल्या काही दिवसात वेगाने घटले आहे. पुणे शहरात 2018 नंतर सर्वात कमी तापमान सोमवारी नोंदविण्यात आले. 2018 मध्ये 5.6 अंश सेल्सिअसपर्यंत पारा खाली आला होता. सोमवारी 7.8 अंश सेल्सिअसइतके डिसेंबर महिन्यातील किमान तापमान नोंदविण्यात आले. याशिवाय उपनगरे आणि जिह्यातही पारा खाली गेला असून, एनडीए येथे 6.1, तर शिरूर येथे 6.2 अंश सेल्सिअस तापमान नोंद झाले.
राज्याच्या विविध भागात सोमवारी सकाळी नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे अंश सेल्सिअसमध्ये :
बीड 7.5, मालेगाव 9.6, बारामती 7.3, नांदेड 7.6, उदगीर 7.7, धाराशिव 9.4, पुणे 7.8, नाशिक 9.4, सातारा 10.4, औरंगाबाद 9.6, परभणी 8.2, गोंदिया 7.4, गडचिरोली 9.