महाराष्ट्रातील टोळीचा म्हापसा पोलिसांकडून पर्दाफाश
पाच जणांना अटक, बोलेरो जीप, रोख 59 हजार जप्त
म्हापसा : म्हापसा येथील सोनाराला एक लाख ऊपयांचा गंडा घालणाऱ्या पनवेल महाराष्ट्र येथील बनवेगिरी करणाऱ्या टोळीला म्हापसा पोलिसांनी अटक केली आहे. संशयितांकडून वापरण्यात आलेली बोलेरो जीप आणि 59 हजार ऊपये रोख रक्कम असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पालये उसकई येथील रेश्मा ओगळे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. गजाआड केलेल्या संशयितांमध्ये मनिष शशिकांत आंबेकर (47), शिवम मनीष आंबेकर (24), रवी श्रीपती चव्हाण (42), करण रवी चव्हाण (20) व यश रवी चव्हाण (20) यांचा समावेश आहे. ही चोरीची घटना मंगळवार दि. 21 जानेवारी रोजी सायंकाळी 4.35 च्या सुमारास घडली होती.
याप्रकरणी सराफी दुकानातील सेल्स गर्ल रेश्मा ओगळे (रा. पुनोळा उसकई) हिने पोलिसात तक्रार नोंदवली आहे. मनीषने म्हापसा मार्केटमधील एका नामांकित सोनाराकडे मोबाईलवरून संपर्क साधला. बाईच्या आवाजात आपण मुथूट फायनान्स कंपनीची मॅनेजर बोलत असून आपणास मुलीच्या लग्नासाठी काही दागिने (दोन बांगड्या) करायच्या आहेत. त्यामुळे किती खर्च येईल, अशी विचारणा केली. त्यावर त्या सराफाने दोन लाख ऊपये खर्च येणार असे सांगितले. त्यानंतर बोलता बोलता संशयित मनीष आंबेकरने सोनाराला आपणाकडे एक लाख ऊपये रोख रक्कम आहे. त्यात पन्नास, शंभर व दोनशे ऊपयांच्या नोटा आहेत. तेवढे चालतील का असे विचारताच त्या सोनाराने सकारात्मक उत्तर दिले.
ठरल्याप्रमाणे त्या सोनाराने आपल्या दुकानातील सेल्सगर्लकडे एक लाख रोख रक्कम पाठवून दिली. मुथूट फायनान्सच्या कार्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावरच संशयित मनीष आंबेकरने सोनाराने पाठवलेल्या महिलेला गाठले. तिला नावाने हाक मारून तिच्याकडून एक लाख रोख ऊपये घेतले. त्या बदल्यातील पैसे वर कार्यालयात भेटतील तसेच दागिन्यांचे माप घेण्यासाठी वर कार्यालयात दुसऱ्या मजल्यावर जा, असे तिला सांगितले. इमारतीचा जिना चढताना मुथूट फायनान्सचे कार्यालय पहिल्या मजल्यावर असल्याचे तसेच आपली फसवणूक झाल्याचे सदर सेल्सगर्लच्या लक्षात आले. ती मागे वळण्यापूर्वीच मनीषने तेथून पोबारा केला. तिने त्याला रोखून धरण्याचा प्रयत्न केला, मात्र यात तिला अपयश आले. याबाबत तिने पोलिसांना माहिती दिली.
संशयिताचे कळंगुटमध्ये हॉटेलात वास्तव्य
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज धुंडाळले. गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी 22 रोजी संशयितांचा शोध घेत टोपीबाज टोळीला कळंगुट येथून अटक केली. टोळीकडून पोलिसांनी चोरीतील 59,000 ऊपये रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच एम एच डी 2753 ही महिंद्रा बोलेरो जीप जप्त केली. सदर जीप ही बागातील टिटोज लेनमध्ये ठेवण्यात आली होती. तर संशयित हे कळंगूटमधील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते.
दरम्यान पोलिस निरीक्षक निखील पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाबलो परब, दत्तप्रसाद पंडित, हवालदार सुशांत चोपडेकर, कॉन्स्टेबल प्रकाश पोळेकर, महेंद्र मांद्रेकर, अक्षय पाटील, आनंद राठोड, लक्ष्मीकांत नाईक, व राजेश कांदोळकर या पथकाने कारवाई केली. पुढील तपास पोलिस अधीक्षक अक्षत कौशल व उपअधीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.
संशयित सराईत गुन्हेगार
मनीष आंबेकर हा या टोळीचा म्होरक्या असून तो सराईत गुन्हेगार आहे. महाराष्ट्रातील विविध पोलिसस्थानकात त्याच्याविरूद्ध फसवणुकीचे तब्बल नऊ गुन्हे नोंद आहेत. मनीष आंबेकर व रवी चव्हाण हे नात्याने भावोजी-मेहुणे असून इतर तीन संशयित त्यांची मुले आहेत.