महाराष्ट्र धर्मासाठी
दोन प्रभावी पण अडचणीत आलेले नेते राज आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने राज्याच्या राजकारणात नवे वारे वाहू लागले आहे. या घडामोडीमुळे मराठी जनमानसात आनंदाचे आणि आशेचे वातावरण आहे. आता त्यांचा आणि त्यांच्या मित्र पक्षांचा अजेंडा काय येतो याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. केवळ मुंबईचा विचार न करता, ग्रामीण आणि शहरी भागांचा समतोल साधणारी रणनीती आखली गेली, तरच त्यांचे महाराष्ट्रकारण आणि राजकारण यशस्वी होऊ शकेल. सध्या सत्ता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हातात प्रचंड बहुमतासहित एकवटली आहे. याविरुद्ध ठाकरे आणि त्यांच्या मित्रपक्षांना रस्त्यावरची लढाई लढायची आणि जनतेला आपल्या बाजूने करायचे आहे. राज्यात मराठीची गळचेपी, औद्योगिक पीछेहाट, बेकारी आणि सार्वजनिक संपत्ती काही मोजक्या उद्योगपतींच्या घशात जाणे यासह शेतकरी, कामगार, कर्मचारी, सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन मुद्द्यांवर सरकारला जेरीस आणण्याची संधी आहे. जनतेत असंतोष पेरण्यात ते पटाईत असले तरी त्यांचे पक्ष फोडण्यात सत्ताधारीही तितकेच पटाईत आहेत. ही लढाई जनतेच्या जोरावर असेल तर त्यासाठी प्रामाणिक माणसांना नेते करावे लागेल. आपल्या कानाजवळ असलेल्यांचे न ऐकता वास्तव काय आहे ते जाणून प्रत्येक भागात लढण्यास सज्ज असे कार्यकर्ते नेते बनवावे लागतील आणि प्रत्येक मुद्द्यांवर आपली ठाम भूमिका ठेवावी लागेल. सत्ता अनेक मार्गाने सत्वपरीक्षा पाहील तेव्हा जर ते डगमगले, तर हा पत्त्यांचा बंगला कोसळेल. महाराष्ट्रात मुंबईसारखे आर्थिक केंद्र, पुणे-नाशिकसारखी औद्योगिक हब, आणि उर्वरित महाराष्ट्राचा ग्रामीण कृषिप्रधान भाग आहे. त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्यापुढची आव्हाने लक्षात घेऊन विभागवार आंदोलन छेडावे लागेल. याशिवाय फक्त विकासच नव्हे, तर भाषिक अस्मिता जपण्यासाठीही एकत्र प्रयत्न आवश्यक आहेत. राज आणि उद्धव ठाकरे या राजकीय एकत्रीकरणामुळे नवी आशा निर्माण झाली आहे. त्यांच्याकडून केवळ भावनिक आवाहनांपलिकडे जाऊन ठोस आणि सर्वसमावेशक धोरण गरजेचे आहे. त्यांचा अजेंडा प्रत्येक भागाच्या गरजा लक्षात घेईल तेव्हाच त्याला संपूर्ण महाराष्ट्रात साथ लाभेल. केंद्रावर दबाव टाकण्यासाठी आर्थिक विकास, रोजगार निर्मिती, स्टार्टअप्स, लघु-मध्यम उद्योगांना चालना यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल.विदर्भ-मराठवाड्यासारख्या भागात शेतीपूरक उद्योग नाहीत, शेतमालाला भाव नाही. अशावेळी जनतेत शरद जोशींसारखा लाखो शेतकरी स्त्राr पुरुषांचा विश्वास मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावोगाव संपर्क साधावा लागेल. त्यांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालावे लागेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून साखर कारखान्यांच्याकडून होणाऱ्या लुटीपर्यंत सत्ताधाऱ्यांविरोधात उभं राहणं गरजेचं आहे. कारखानदार आपले नाहीत हे ध्यानात घेऊन गरज पडल्यास सोबतच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांशीही मतभेद पत्करावे लागतील. अन्यथा आघाडीच्या राजकारणात डाव्या पक्षांना आपल्या पक्षाची आहुती द्यावी लागली तशी वेळ येईल. हा धोका जाणून सहकाराच्या चांगल्या कार्याला उचलून धरणे आणि शेतकरी विरोधी धोरणांना ठाम विरोध करणे हा मुद्दा दोन्ही ठाकरे बंधूंना अगदी पवारांपासून काँग्रेसपर्यंत सर्वांच्या दबावांना झुगारून ताणावा लागेल. पायाभूत सुविधा, प्रक्रिया उद्योग, इंटरनेट, आरोग्य आणि शिक्षण हे सर्व ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी ठोस कार्यक्रम हवे आहेत. आज अनेक आरोग्य योजना असल्या तरी सर्वसामान्यांवर उपचार होत नाहीत. मात्र सरकारचा पैसा यंत्रणेकडून उकळला जातो. पीपीपी मॉडेलमुळे सरकारी दवाखान्यात खासगी यंत्रणा उभारली मात्र पैसे उकळून हे योग्य उपचार होत नाहीत. केवळ पैसा कमवणं सुरू आहे. अशा प्रकारच्या लुटीविरुद्ध स्थानिक पातळीवर लढावे लागेल. मातृभाषेतील शिक्षण, स्थानिक हस्तकलेला न्याय, आणि सांस्कृतिक संपदा जपण्याच्या लढ्यात आघाडी घ्यावी लागेल. कोल्हापुरी चप्पलचे उदाहरण ताजे आहे. एका खासगी ब्रँडने परदेशामध्ये नक्कल करून प्रचंड पैसा कमावला. मात्र या कोल्हापुरी कारागिरांच्या बाजूने जागतिक पातळीवर लढायला कोणी तयार झाले नाही. तिथे हे पक्ष लोकांच्यासाठी मैदानात उतरले पाहिजेत. त्यांनी लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे. तर लोकांची सरकार ऐवजी विरोधकां बाबतीत सहानुभूती वाढेल. राज्यात आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. कर्ज आणि व्याजाचा बोजा वाढत आहे, योजनांवर खर्च होत नाही. परिणामी उद्योग येत नाहीत, युवक बेरोजगार राहत आहेत. या पार्श्वभूमीवर हे नेते संपूर्ण महाराष्ट्राला सामावून घेणारी भूमिका घेतील, तरच ही लढाई यशस्वी होईल.जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी ठोस कृती हवी. विचारभिन्नतेचा समन्वय साधत, सत्ताधाऱ्यांशी लढावे लागेल. या दोघांमध्ये वत्तृत्वात लोकांना जोडण्याची आणि सरकारला नमवण्याचीही ताकद आहे. त्यांनी परस्पर आदर राखत आणि दूरदृष्टी ठेवत काम केल्यास हे एकत्रीकरण इतिहासात मैलाचा दगड ठरू शकते. त्यासाठी त्यांना आधी प्रादेशिक मराठी हितासाठी संघर्ष करावा लागेल. कार्यकर्त्यांना बळ देणाऱ्या कार्यक्रमांनीच ते जनतेचे नेते होतील. बाळासाहेबांनी सर्वसामान्य माणसांना नेते बनवून त्यांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न तीव्रतेने मांडून एकट्याच्या जीवावर यशस्वी होण्याचा प्रयोग करून दाखवला आहे. तो आता या दोन बंधूंना आपापल्या पक्ष आणि संघटनेच्या बळावर पुन्हा करायचा आहे. तोही खुल्या आणि छुप्या शत्रूंशी लढत! सत्तेचे जास्तीत जास्त तूप आपल्या रोटीवर ओढून घेण्यासाठी चढाओढ लागली असताना जनतेचा आवाज बनून त्यांच्या हक्काचे पदरात पाडून देण्यासाठी जर ही शक्ती राबली तर त्यांना उज्वल भविष्यकाळ आहे. हिंदुत्व आणि राष्ट्रीय भूमिका ठीक आहेत, पण आधी आपण प्रादेशिक-मराठी आहोत आणि मराठीची कट्टर भूमिका राखावी लागेल. महाराष्ट्राला जाती आणि धर्माच्या वादात पेटू न देता सर्व क्षेत्रातील प्रगतीसाठी जर त्यांचे नेतृत्व उपयोगात पडले तर ते महाराष्ट्रधर्माच्या मूळ विचारापर्यंत जाऊ शकतील.