दिवाळीत भेसळखोरांवर एफडीएचा कडक बडगा; मिठाई, खवा आणि खाद्यतेलावर राज्यव्यापी कारवाई; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा
दिवाळीच्या काळात मिठाई, खवा, नमकीन, खाद्यतेल आणि दुग्धजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. एफडीए हे जनतेच्या आरोग्याचे संरक्षण करणारे कवच असून, बाजारात कुठेही खाद्यपदार्थांमध्ये भेसळ किंवा चुकीचे प्रकार आढळल्यास नागरिकांनी थेट प्रशासनाकडे तक्रार करावी, असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.
मिठाई आणि खवा खरेदी करताना काळजी घ्या
सणासुदीच्या काळात मिठाई आणि खव्याला मोठी मागणी असते. त्यामुळे नागरिकांनी एफडीएचा वैध परवाना असलेल्या दुकानातूनच मिठाई खरेदी करावी. आवश्यक असेल तेवढीच मिठाई खरेदी करून दोन दिवसांत संपेल इतकाच साठा ठेवावा. आठ दिवस पुरेल एवढी मिठाई खरेदी करून फ्रिजमध्ये साठवणे टाळावे, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.
लेबल नसलेला, मुदतबाह्य किंवा अत्यंत स्वस्त आणि भडक रंगाचा खवा खरेदी करू नये. मिठाई आणि लाडूंमध्ये रासायनिक रंगांचा अतिरिक्त वापर टाळावा. नियमांचे उल्लंघन करणारे भडक रंगांचे अन्नपदार्थ प्रशासनाकडून नष्ट करण्यात आले आहेत.
दूध, तूप आणि तेलाच्या भेसळीवर लक्ष
सुटे किंवा कच्चे दूध घेण्याऐवजी पॅक केलेले दूध खरेदी करण्याचा सल्ला एफडीएने दिला आहे. तूप आणि खाद्यतेलामध्ये प्राण्यांची चरबी किंवा रासायनिक भेसळ आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
तळणीसाठी वापरण्यात येणाऱ्या खाद्यतेलाचा वारंवार पुनर्वापर करू नये. तेलाचा सतत वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे खाद्यपदार्थ तयार करताना तेलाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे.
मिठाईवरील चांदीचा वरक शुद्ध असावा
मिठाईवर लावण्यात येणारा चांदीचा वरक शुद्ध चांदीचाच असावा. चांदीऐवजी ॲल्युमिनियमचा वापर केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा एफडीएने दिला आहे.
दिवाळीनिमित्त भेट दिले जाणारे गिफ्ट बॉक्स, चॉकलेट्स, केक, मोदक आणि मिठाईचे हॅम्पर खरेदी करताना त्यावरील लेबलिंग, उत्पादनाची माहिती आणि मुदतबाह्य तारीख तपासणे आवश्यक आहे. गिफ्ट पॅक किंवा हॅम्परमध्ये मुदतबाह्य वस्तू असण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी.
नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना योग्य माहिती घेऊनच निर्णय घ्यावा आणि भेसळमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
