Farm Loan Waiver शेतकऱ्यांना इतक्यात कर्जमाफी नाहीच...५६ लाख शेतकरी प्रतिक्षेत
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफी जाहीर केली होती. त्यामुळे राज्यभरातल्या शेतकरी वर्गातून या योजनेची अंमलबजावणी कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांना आणखी वाट पाहण्याची गरज आहे, त्याचं कारण म्हणजे कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीसाठी इन्कम टॅक्ससंदर्भातली माहिती केंद्राकडून घेतल्यानंतर पुढची प्रक्रिया वेगवान होणार असल्याचे सांगितले, ही माहिती मिळण्यास चार ते पाच दिवसांचा अवधी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही?
राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेत ज्या शेतकऱ्यांनी इन्कम टॅक्स वेळेत भरला आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी की नाही, याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नाही अशी माहिती समोर आली आहे. परंतु आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही . मात्र यानंतर शेतकरी संघटना आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
इतके शेतकरी होतील लाभार्थी
महायुती सरकारने मंजूर केलेल्या कर्जमाफीचा लाभ ५ जुलैनंतर होणार असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती. मात्र आता यासाठी शेतकऱ्यांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतून ५६ लाख शेतकऱ्यांची २ लाखांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर देण्यात येणार आहेत. आता या सगळ्या योजनांची अमंलबजावणी कधी होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.