For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्रात 19,599 ठिकाणी वीजचोरी उघड; महावितरणला 30.36 कोटींच्या वीजचोरीने महावितरणला बसला मोठा शॉक

10:34 AM Aug 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्रात 19 599 ठिकाणी वीजचोरी उघड  महावितरणला 30 36 कोटींच्या वीजचोरीने महावितरणला बसला मोठा शॉक
Advertisement

मुंबई: वीजचोरीविरोधात महावितरणने राज्यभर सुरू केलेल्या धडक मोहिमेत गेल्या 4 महिन्यांत तब्बल 19,599 ठिकाणी वीजचोरी उघडकीस आली आहे. थेट तारांना हुक लावून वीजचोरी करणे आणि मीटरमध्ये फेरफार करण्याच्या 15,965 प्रकरणांत तब्बल ₹30.36 कोटींची वीजचोरी झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. उर्वरित 3,634 प्रकरणांचे मूल्यांकन सुरू असून, वीजचोरीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement

महावितरणच्या महसुलाला मोठा फटका देणाऱ्या वीजचोरीविरोधात राज्यात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक तसेच अन्य वर्गवारीतील ग्राहकांच्या वीजजोडण्यांची तपासणी केली जात आहे. अनधिकृतपणे वीज वापरणे, तारांना थेट हुक टाकणे आणि मीटरमध्ये फेरफार करून वीजवापर लपवणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

एप्रिलपासून झालेल्या तपासणीत कोकण प्रादेशिक विभागात सर्वाधिक 7,496 वीजचोरीची प्रकरणे उघड झाली आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागात 4,597, नागपूर विभागात 4,521, तर पुणे प्रादेशिक विभागात 2,985 प्रकरणे समोर आली आहेत. राज्यातील 4 प्रादेशिक विभागांत मोठ्या प्रमाणावर वीजचोरी होत असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे.

Advertisement

खंडित जोडण्यांवरही नजर

थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या जोडण्यांचीही महावितरणकडून तपासणी केली जात आहे. पुरवठा खंडित केल्यानंतर अन्य ठिकाणाहून अनधिकृतपणे वीजवापर होत असल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध वीजचोरीची स्वतंत्र कारवाई केली जात आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी अनधिकृत जोडणी करून वीज वापरणे टाळावे, असा इशारा महावितरणने दिला आहे.

3 वर्षांपर्यंत तुरुंगवास

वीजचोरीची संपूर्ण रक्कम आणि दंड विहित मुदतीत भरला नाही, तर भारतीय विद्युत कायदा, 2003 मधील कलम 135 नुसार फौजदारी कारवाई केली जाते. वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी दंडासह 3 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे. त्यामुळे वीजचोरी करणाऱ्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Advertisement
Tags :

.