For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात दुष्काळसदृश स्थिती; सरकारकडून उपाययोजनांसाठी मोठी तयारी; मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन

03:08 PM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
राज्यात दुष्काळसदृश स्थिती  सरकारकडून उपाययोजनांसाठी मोठी तयारी  मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन
Advertisement

मुंबई :   राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेऊन त्याबाबत वेळोवेळी निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या समितीचे अध्यक्ष असतील.

Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीला आवश्यकतेनुसार निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. येत्या शनिवारीपर्यंत प्राथमिक अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्री आणि लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. पिकांची स्थिती आणि पावसाच्या कमतरतेचे मूल्यांकन करण्यासाठी सरकारकडून सर्वेक्षणही सुरू आहे.

Advertisement

मोघरपाडा शेतकऱ्यांना विकसित भूखंड

मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई मेट्रो मार्ग 4, 4-अ आणि 10 प्रकल्पाच्या एकात्मिक कारशेड डेपोसाठी जमीन दिलेल्या मोघरपाडा येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना विकसित भूखंड मालकी हक्काने वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली. सर्व्हे क्रमांक 30 मधील पात्र शेतकऱ्यांना 22.5 टक्के आणि 12.5 टक्के विकसित भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खारमधील म्हाडा इमारतींचा समूह पुनर्विकास

मुंबईतील खार पश्चिम येथील रामकृष्णनगर परिसरातील म्हाडाच्या जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा समूह पुनर्विकास करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. रहिवाशांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा पुनर्विकास करण्यात येणार आहे.

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा अधिकृत आढावा घेऊन पुढील मदत व उपाययोजनांबाबत निर्णय घेण्याची प्रक्रिया आता वेगाने पुढे जाणार आहे.

Advertisement
Tags :

.