शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! दुष्काळग्रस्तांना 5 हजारांची अग्रीम मदत; दोन दिवसांत खात्यात पैसे जमा होणार; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उपलब्ध माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत मदतीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. गुरुवारपर्यंत राज्यातील सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांत एकूण 7,500 कोटी रुपये जमा करण्याचे नियोजन असल्याचे वृत्त आहे.
फार्मर आयडी आणि केवायसीच्या आधारे मदत
ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे, त्यांच्या बँक खात्यात थेट मदत जमा केली जाणार आहे. फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांची केवायसी पडताळणी करून मदतीचा लाभ देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मदतीतून बँकांना कर्जाची वसुली करता येणार नाही?
शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाल्यानंतर बँका थकीत कर्जापोटी पैसे कापून घेतील, अशी भीती व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर मदतीची रक्कम कापून घेऊ नये, असे स्पष्ट निर्देश बँकांना देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना केल्याचे वृत्त आहे.
जलसंधारणावरही विशेष भर
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आल्या. छोटे बंधारे बांधणे, तलावांचे रुंदीकरण, गाळ उपसणे आणि लोकसहभागातून पाणी अडवून भूजल पुनर्भरण वाढविणे यांसारख्या उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे. प्रत्येक मंत्र्याने आपल्या जिल्ह्यात पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची चौथी यादी जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. अग्रीम मदतीमुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या काळात आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
