For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाऊस झाला, नंतर खंड पडला; करपलेल्या पिकांची पाहणी करून मदत देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

05:31 PM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाऊस झाला  नंतर खंड पडला  करपलेल्या पिकांची पाहणी करून मदत देणार  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Advertisement

मुंबई : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दुष्काळाच्या तांत्रिक निकषांमध्ये न बसणाऱ्या, मात्र प्रत्यक्षात पिकांचे नुकसान झालेल्या तालुक्यांमध्ये जमिनीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीचे लाभ देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.

Advertisement

यंदा राज्यातील काही भागांत सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, तर त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडला. त्यामुळे काही तालुक्यांमध्ये पिके करपली असली तरी ते ‘ट्रिगर-1’ किंवा इतर तांत्रिक निकषांमध्ये बसत नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे.

अशा तालुक्यांमध्ये आता मोठ्या प्रमाणावर ग्राउंड सर्व्हे आणि प्रत्यक्ष पीक पाहणी केली जाणार आहे. पाहणीमध्ये पिकांचे प्रत्यक्ष नुकसान झाल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना दुष्काळाशी संबंधित मदत आणि सवलतींचा लाभ दिला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Advertisement

मंत्रिमंडळाच्या उपसमितीलाही संबंधित तालुक्यांतील परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केवळ तांत्रिक निकषांमुळे नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी विशेष बाब म्हणून ही कार्यपद्धती स्वीकारण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-1’ अंतर्गत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या भागांमध्ये दुष्काळ निवारणाच्या विविध उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.

Advertisement
Tags :

.