For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचाही समावेश

05:19 PM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या  सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचाही समावेश
Advertisement
सावंतवाडी, प्रतिनिधी : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सहकार विभागाने २७ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. या निर्णयात सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचाही समावेश असल्याने बँकेची आगामी पंचवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता होती. मात्र, शासनाच्या नव्या आदेशामुळे निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित राहणार आहे. यापूर्वीही जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता पुन्हा एकदा निवडणूक पुढे गेल्याने इच्छुक उमेदवार आणि सभासदांचे लक्ष शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

Advertisement

राज्यातील ३०४ तालुके दुष्काळी घोषित

दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले. कृषी आयुक्तांच्या अहवालानुसार राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ लागू झाला होता. त्यानंतर पर्जन्यमानातील तूट आणि इतर घटकांचा विचार करून शासनाने राज्यातील ३०४ तालुके दुष्काळी म्हणून घोषित केले आहेत.

या तालुक्यांमध्ये दुष्काळ निवारण आणि मदतकार्याशी संबंधित उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी महसूल, कृषी, सहकार, ग्रामविकास, पाणीपुरवठा आणि जलसंधारण विभागांवर अतिरिक्त प्रशासकीय जबाबदारी निर्माण झाली आहे.

Advertisement

दुष्काळ निवारणाच्या कामांना प्राधान्य

सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू ठेवल्यास शासकीय अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत गुंतण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळ निवारणाच्या कामांवर परिणाम होऊ शकतो. तसेच दुष्काळग्रस्त भागांतील शेतकरी आणि सहकारी संस्थांच्या सभासदांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणे गैरसोयीचे ठरू शकते, असे शासनाने आदेशात नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर दुष्काळ घोषित केलेल्या जिल्ह्यांतील सहकारी संस्थांच्या निवडणुका सध्या ज्या टप्प्यावर आहेत, त्या टप्प्यावरून पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणत्या संस्थांना मिळणार अपवाद?

शासनाच्या आदेशानुसार, सहकारी गृहनिर्माण संस्था, उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिलेल्या संस्था आणि आदेशाच्या तारखेपूर्वीच निवडणूक प्रक्रियेतील नामनिर्देशनाचा टप्पा सुरू झालेल्या संस्था यांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशानुसार अपर निबंधक तथा सहसचिव संतोष पाटील यांनी हा आदेश जारी केला आहे. दुष्काळ निवारणाच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह संबंधित सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक बदलणार आहे.

Advertisement
Tags :

.