दुष्काळात संवेदनशीलता दाखवा; अनावश्यक खर्च टाळा, दुष्काळग्रस्तांना मदत करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर | प्रतिनिधी : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर सरकारने मदतकार्याला सुरुवात केली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संवेदनशीलता दाखवत अनावश्यक खर्च टाळावा आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये सरसकट मदत देण्याची प्रक्रिया सुरू असून, दुष्काळ निवारणासाठीच्या 12 तातडीच्या उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली आहे. ‘फर्स्ट ट्रिगर’नुसार आदेश काढण्यात आले असून, आवश्यक ठिकाणी पंचनामे सुरू आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
दुष्काळाच्या यादीत समाविष्ट न झालेल्या काही तालुक्यांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा तालुक्यांचीही पाहणी करण्यात येणार असून, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ‘ट्रिगर-३’अंतर्गत मदत देण्यात येईल. कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मोठ्या धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन आगामी पाणीटंचाई लक्षात घेऊन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुष्काळाच्या परिस्थितीत लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रमांमधील टाळता येणारा खर्च कमी करावा. त्यातून होणारी बचत दुष्काळग्रस्तांना मदतीच्या स्वरूपात देता येईल, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.
आर्थिक मदतीबरोबरच नागरिकांनी दुष्काळग्रस्तांना शक्य त्या इतर स्वरूपातही सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.