महाराष्ट्राचा मुंबईवर 128 धावांनी विजय
सामनावीर अर्शिन कुलकर्णीनेचे दमदार शतक
वृत्तसंस्था / जयपूर
विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील येथे शनिवारी झालेल्या इलाईट क गटातील सामन्यात अर्शिन कुलकर्णीच्या दमदार शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने मुंबईचा 128 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात महाराष्ट्राला चार गुण मिळाले.
या सामन्यात महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राने 50 षटकांत 4 बाद 366 धावा झळकविल्या. त्यानंतर महाराष्ट्राच्या अचूक गोलंदाजीसमोर मुंबईचा डाव 42 षटकांत 238 धावांत आटोपला.
महाराष्ट्राच्या डावामध्ये अर्शिन कुलकर्णी आणि पृथ्वी शॉ यांनी दमदार फलंदाजी करत सलामीच्या गड्यासाठी 140 धावांची शतकी भागिदारी केली. शॉने 75 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 71 धावा झळकविल्या. मुशिर खानने त्याला पायचित केले. कर्णधार गायकवाडने कुलकर्णीला चांगली साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 108 धावांची शतकी भागिदारी केल्याने महाराष्ट्राने 350 धावांचा टप्पा ओलांडता आला. अर्शिन कुलकर्णीने 114 चेंडूत 3 षटकार आणि 11 चौकारांसह 114 धावा झळकविल्या. तुषार देशपांडेने त्याला झेलबाद केले. मुलानीने गायकवाडचा त्रिफळा उडविला. त्याने 52 चेंडूत 7 चौकारांसह 66 धावा जमविल्या. राहुल त्रिपाठीने 25 चेंडूत 1 षटकारासह 23 धावा केल्या. रामकृष्ण घोषने आक्रमक फलंदाजी करताना केवळ 27 चेंडूत 5 षटकार आाि 3 चौकारांसह नाबाद 64 धावा झळकविल्या. मुंबईतर्फे तुषार देशपांडेने 2 तर मुशीर खान व मुलानी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबईच्या डावामध्ये सलामीचा रघुवंशी आणि सिद्धेश लाड यांनी अर्धशतके झळकविली. आक्रमक फलंदाजी जैयस्वाल केवळ तीन धावांवर बाद झाला. त्यानंतर मुशिर खानला खातेही उघडता आले नाही. रघुवंशी आणि लाड यांनी तिसऱ्या गड्यासाठी 99 धावांची भागिदारी केली. लाडने 41 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 52 धावा जमविल्या. चिन्मय सुतार दोन धावांवर धावचीत झाला. मुलानीने 30 चेंडूत 2 चौकारांसह 24 धावा जमविताना रघुवंशीसमवेत पाचव्या गड्यासाठी 49 धावांची भागिदारी केली. तुषार देशपांडे व हार्दीक तेमोरे हे लवकर बाद झाले. रघुवंशीने 88 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह 92 धावा जमविल्या. त्याचे शतक केवळ 8 धावांनी हुकले. तनुष्य कोटीयलानने 36 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 36 धावा केल्या. 42 षटकांत मुंबईचा डाव 238 धावांवर आटोपला. महाराष्ट्रातर्फे दधेने 43 धावांत 3 तर बचावने 44 धावांत 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक: महाराष्ट्र 50 षटकांत 4 बाद 366 (अर्शिन कुलकर्णी 114, शॉ 71, गायकवाड 66, घोष नाबाद 64, त्रिपाठी 23, अवांतर 19, तुषार देशपांडे 2 बळी, मुलानी व मुशीर खान प्रत्येकी 1 बळी), मुंबई 42 षटकांत सर्वबाद 238 (रघुवंशी 92, लाड 52, मुलानी 24, कोटीयान नाबाद 36, दधे 3-43, बचाव 2-44, घोष, हंगीरकगेकर, ओसवाल व अर्शिन कुलकर्णी प्रत्येकी 1 बळी.