For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भोंदूगिरीच्या प्रेमातील नेत्यांमुळे महाराष्ट्र बदनाम!

06:53 AM Mar 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
भोंदूगिरीच्या प्रेमातील नेत्यांमुळे महाराष्ट्र बदनाम
Advertisement

महाराष्ट्र राज्यात जादूटोणाविरोधी कायदा 2013 साली प्रत्यक्षात आला. मात्र म्हणून ज्या कायदेमंडळात हा कायदा संमत करण्यात आला त्या कायदेमंडळाचे सदस्य आणि मंत्री भोंदू बाबांच्या पाशातून सुटले का? या प्रश्नाचे उत्तर अशोक खरात बरोबर राज्यातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांच्या फोटोने दिले आहे. पूर्वीच्या काळी जडीबुटीची फसवी औषधे विकणारे वैदू देशातील मोठमोठ्या नेत्यांबरोबरचे फोटो लावायचे. तीच भोंदूगिरी पांढऱ्या कपड्यातील बाबा लोक करत आहेत. त्याला नेते आणि नेत्यांमुळे सर्वसामान्य जनता बळी पडत आहे. अशावेळी एसआयटी या बाबांना किती काळ जेलमध्ये ठेवणार हा प्रश्नच आहे?

Advertisement

महाराष्ट्राबाहेर एका स्टायलिश बाबाची अलीकडेच सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता झाली. त्याच्या छळाचे पत्रकार बळी ठरले होते अशाच पद्धतीने नाशिकच्या भोंदू खरात प्रकरणात सुद्धा आवाज उठवणारे पत्रकार होरपळले. 2005 मध्ये ज्याचा भांडाफोड झाला होता त्या खरातच्या मागे नेत्यांचा गोतावळा कसा लागला हा संशोधनाचा विषय आहे. नेत्यांबरोबरच अनेक छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील महिलादेखील या बाबाच्या कच्छपी लागून किती वाहवत गेल्या आहेत हे तपासात उघड होईल, याची शक्यता कमीच आहे. ज्या कथीत पेन ड्राईव्हमध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले त्यातील महिला तरी तक्रार द्यायला तयार होतील का? हा देखील प्रश्न आहे. अंधश्रद्धेपोटी स्वत:चे बोट कापून घ्यायला तयार होणारे नेते, या बाबाला वाचवण्यासाठी आणि आपली ईभ्रत राखण्यासाठी काहीही करू शकतील अशी लोकांची भावना बनली आहे. कायदा करणाऱ्यांनी दिलेला हा धक्का लक्षात घेता रूपाली चाकणकर यांचे पद घालवून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न होईल हे निश्चित.

एका ‘कॅप्टन’ च्या नावाखाली चाललेल्या भोंदूगिरीचा भयानक चेहरा आता पुरता समोर आला आहे. स्वत:ला मर्चंट नेव्हीचा निवृत्त अधिकारी, अंकशास्त्रज्ञ, कॉस्मोलॉजी तज्ञ आणि दैवी शक्तीधारी म्हणवणारा 67 वर्षीय अशोककुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन याला 18 मार्च रोजी नाशिक गुन्हे शाखेने अटक केली. एका 35 वर्षीय महिलेवर तीन वर्षे (नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025) सतत लैंगिक अत्याचार केल्याच्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी

Advertisement

कॅनडा कॉर्नर येथील ‘ओकस प्रॉपर्टीज’ कार्यालयातून पेन ड्राईव्ह जप्त केला, ज्यात 58 आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले.  त्यात अनेक महिलांचे धक्कादायक दृश्य, हिडन कॅमेरे आणि धार्मिक विधीच्या नावाखालील अश्लील कृत्ये होती. फार्म हाऊसवरून पिस्तुल, गोळ्या आणि संशयास्पद कागदपत्रे हाती लागली. एका धार्मिक व्यक्तीच्या ठिकाणावर अशा वस्तू सापडणे धक्कादायकच. नाशिक जिल्हा न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली. राज्य सरकारने तत्काळ आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी गठित केली.

मुळापासून खरातची पार्श्वभूमी

ही केवळ एका महिलेची कहाणी नाही, हे महाराष्ट्रातील ‘एपस्टीन फाइल्स’ सारखे प्रकरण बनत आहे. खरात सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडीचा रहिवासी. श्री शिवनिका संस्थान (ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट, मिरगाव) चा अध्यक्ष. 22 वर्षे मर्चंट नेव्हीमध्ये सेवा, 154 देशांचे दौरे याच ‘कॅप्टन’ पदवीचा आधार घेत तो लोकांना भुरळ घालत असे. अंकशास्त्र, मंत्र-तंत्र, भूतकाळ-भविष्य दर्शनाचे दावे तो करायचा. 2005 मध्येच त्याचा भांडाफोड झाला होता, तरीही तो वाढला. एकनाथ शिंदे, रूपाली चाकणकर (महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्षा ट्रस्टवर विश्वस्त!), राधाकृष्ण विखे पाटील, दीपक केसरकर यांच्यासह अनेक नेते, सेलिब्रिटी त्याच्याकडे जात. शिंदे यांनी 2022 मध्ये मंदिराला भेट दिल्यानंतर त्याची प्रसिद्धी शिगेला पोहोचली. शिर्डीत शेतकऱ्याचा गहू बळकावल्याचा आरोपही समोर आला.

पीडितेची तक्रार आणि गुह्याची पद्धत

तिची तक्रार गांभीर्याने घेतली गेली ती पिडीता आपली वैवाहिक समस्या सोडवण्यासाठी खरातकडे गेली. त्याने ‘दैवी शक्ती’ दाखवत विश्वास संपादन केला. कार्यालयात बोलावून गुंगीकारक पाणी पाजले, संमोहित अवस्थेत अत्याचार केले. पतीच्या मृत्यूची भीती घातली. काळ्या जादूने आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. धार्मिक विधीच्या नावाखाली तांब्या डोक्यावर ठेवून, अश्लील कृत्ये करून तो याचे व्हिडिओ स्वत:च रेकॉर्ड करत असे. एका महिलेचा वादग्रस्त व्हिडिओही यात उघड झाला.

पोलिस रिमांड अर्जात कागदोपत्री पुरावे

पोलिसांनी सादर केलेल्या रिमांड अर्जामध्ये असलेल्या पुराव्यासह पीडित महिलेची तक्रार, शिवाय हस्तगत केलेले पेन ड्राईव्ह, हिडन सीसीटीव्ही, गुंगीचे पुरावे, धमकीचे संदेश, बलात्कार, फसवणूक, विनयभंग, महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायदा आदी गंभीर गुन्हे लक्षात घेऊन कोर्टाने या प्रकरणात आणखी काही गंभीर उघडकीस येते का याची शक्यता लक्षात घेऊन 6 दिवस पोलीस कोठडी दिली. गुन्हे शाखेने कार्यालय, फार्महाऊस, ट्रस्ट अशा तीन ठिकाणी छापे टाकले.  एसआयटीने तत्काळ काम सुरू केले. तेजस्विनी सातपुते यांनी खरातची दोन तास चौकशी केली. त्यांचा फोकस 58 व्हिडिओ व्हेरिफिकेशन, इतर पीडित महिलांशी बोलून गुन्हे दाखल करणे, 200 कोटींच्या संशयित संपत्ती, वसुली, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील उपदव्याप, शिर्डी जमीन प्रकरण अशा अनेक गोष्टींचा शोध घ्यावा लागणार आहे

एसआयटी काय साधणार?

हे प्रकरण म्हणजे अंधश्रद्धेचा फैलाव, राजकीय शक्तीचा तितकाच दुरुपयोग आणि महिला शोषणाचा दुर्दैवी मेळ आहे. जो महाराष्ट्र सरकार राज्यात घातक असला तरी असे गुरु पावला पावलावर भेटत असतात. राजकारण्यांचे त्यांच्याकडे जाणे येणे सुद्धा कायम असते. खरातसारखे ‘गुरू’ लोकांच्या भावनिक गरजेचा फायदा घेतात. हे मानवी मनोविज्ञानाचे शोषण आहे. 58 व्हिडिओ हे केवळ पुरावे नाहीत; ते अनेक कुटुंबांचा विध्वंस दर्शवतात. सरकारने प्रकरण अंगलट येईल हे लक्षात घेऊन तात्काळ एसआयटी स्थापन केली. पण त्यांचा तपास निष्पक्ष, वेगवान हवा. बीड प्रकरणाप्रमाणे भिजत घोंगडे राहता कामा नये. राजकीय नेत्यांचे एकामागून एक फोटो बाहेर पडत आहेत, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यामध्ये पुरत्या अडकल्याचे दिसत आहे. या बाबाचे पाय धुतानाचे त्यांचे व्हिडिओ, यापूर्वी काही पत्रकारांच्या वर दबाव आणण्यासाठी महिला आयोगाच्या शक्तीचा करण्यात आलेला वापर यामुळे चाकणकर यांचा खराची केवळ ‘संपर्क’ नव्हे तर ‘संरक्षण’ होता का? हे एसआयटीमधून उघड होईल का हा प्रश्न आहे. या प्रकरणात इतर बळी समोर यावेत, ट्रस्टची आर्थिक चौकशी व्हावी, ब्लॅक मॅजिक रॅकेट उघड झाले पाहिजे. खरात प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट केली सुशिक्षित समाजही अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकतो. 2005 पासून चालत आलेला गोरखधंदा आता थांबला. न्याय मिळाला तरच विश्वास टिकेल.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.