पावसातील खंडामुळे 1.49 कोटी हेक्टरवरील पिकांचे नुकसान; चार ते पाच दिवसांत पंचनामे पूर्ण होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
सांगोला तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील राजापूर आणि बुरलेवाडी येथे भेट देऊन दुष्काळसदृश परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी खरीप पिकांची सद्यःस्थिती, पावसाचे प्रमाण आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम आणि शेतीच्या नुकसानीबाबत माहिती जाणून घेतली.
पाणी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी नियोजन
पावसातील खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे भरणे यांनी स्पष्ट केले.
पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मदतीची प्रक्रिया
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे महत्त्वाचे आहेत. आतापर्यंत एक कोटी हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित काम चार ते पाच दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पंचनाम्यांच्या आधारे पात्र शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमधून नियमानुसार मदत देण्यात येईल, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
पावसातील खंडामुळे खरीप हंगामावर परिणाम झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने पंचनामे आणि मदतीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, यावर सरकारकडून भर दिला जात आहे.
