For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

महाराष्ट्रातील अनेक जिल्हा न्यायालयांना बॉम्बस्फोटाच्या धमक्या; न्यायालये रिकामी, पोलिसांची कसून तपासणी; ठाणे, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोलीसह विविध जिल्ह्यांत धमकीचे ई-मेल

03:55 PM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्रातील अनेक जिल्हा न्यायालयांना बॉम्बस्फोटाच्या धमक्या  न्यायालये रिकामी  पोलिसांची कसून तपासणी  ठाणे  सांगली  सोलापूर  बीड  परभणी  हिंगोलीसह विविध जिल्ह्यांत धमकीचे ई मेल
Advertisement
मुंबई : महाराष्ट्रातील विविध जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. ठाणे, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोलीसह अनेक जिल्ह्यांतील न्यायालयांना धमकीचे संदेश प्राप्त झाल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालयीन इमारती रिकाम्या करून परिसरात तपासणी सुरू केली आहे. बॉम्बशोधक व नाशक पथके, श्वान पथके तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी विविध ठिकाणी दाखल झाले असून सायबर पोलिसांकडून धमकीचे ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.

ठाणे न्यायालयाला आयईडी स्फोटाची धमकी

ठाणे जिल्हा न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयाच्या अधिकृत ई-मेलवर आज सकाळी 9.43 वाजता पंजाबी भाषेत धमकीचा संदेश प्राप्त झाला. न्यायालयात बॉम्ब ठेवण्यात आला असून दुपारी 3.11 वाजता त्याचा स्फोट होणार असल्याचा उल्लेख या ई-मेलमध्ये करण्यात आला होता. तसेच 27 नोव्हेंबरपर्यंत ठाणे जिल्हा न्यायालयात आयईडी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे.

Advertisement

ई-मेलमध्ये मेट्रो स्थानकांवर रात्री 9.11 वाजता बॉम्बस्फोट घडवण्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. 1984 मधील रक्तपाताचा बदला रक्ताने घेण्याची भाषा संदेशात वापरण्यात आली आहे. तसेच आपण गायक दिलजीत दोसांझ यांचे साथीदार असल्याचा दावा करत 27 नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या कार्यक्रमात आयफोनमध्ये आयईडी ठेवून स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे.

ठाणे परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा संदेश प्राप्त होताच निर्धारित मानक कार्यपद्धतीनुसार न्यायालयाच्या दोन्ही इमारती रिकाम्या करण्यात आल्या. वरच्या मजल्यापासून खालच्या मजल्यापर्यंत सर्वांना बाहेर काढून सुमारे 100 मीटर अंतरावरील सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

Advertisement

बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून न्यायालयाच्या आठ मजली इमारती, पार्किंग क्षेत्र, कॅन्टीन आणि संपूर्ण परिसराची तपासणी सुरू करण्यात आली. गुन्हे शाखा आणि सायबर सेलचे अधिकारीही ई-मेलच्या स्रोताचा शोध घेत आहेत.

सांगली, सातारा आणि सोलापूर न्यायालयांमध्येही तपासणी

सांगली जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्ब ठेवण्यात आल्याचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. ई-मेलमध्ये दुपारी 3.11 वाजता न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून देण्याचा उल्लेख असल्याची माहिती आहे. संदेश प्राप्त होताच न्यायाधीश, वकील, पक्षकार आणि कर्मचाऱ्यांना न्यायालयातून बाहेर काढण्यात आले.

सांगली जिल्हा पोलीस दलाचे अधिकारी बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकासह न्यायालयात दाखल झाले. संपूर्ण इमारतीची तपासणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.

सातारा न्यायालयालाही धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती आहे. त्यानंतर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याचा संदेश मिळाल्याने तेथील न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला. न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांना बाहेर काढून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपासणी सुरू करण्यात आली.

परभणी, हिंगोली आणि बीडमध्येही पोलिसांची धाव

परभणी जिल्हा न्यायालयालाही धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने खबरदारी घेत न्यायालय परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली. बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक आणि पोलीस अधिकारी न्यायालयात दाखल झाले असून इमारतीची तपासणी करण्यात आली.

हिंगोली शहरातील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर सकाळी 11 वाजता बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली. यामुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली. हिंगोली शहर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा, बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकाने न्यायालयाच्या इमारतीची तपासणी सुरू केली. सायबर पोलिसांकडूनही ई-मेलचा तपास केला जात आहे.

बीड जिल्हा सत्र न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्ब ठेवल्याचा संदेश प्राप्त झाल्यानंतर न्यायालयाची इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. न्यायाधीश, वकील, पक्षकार आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू आहे.

सायबर पोलिसांकडून ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध

राज्यातील अनेक न्यायालयांना एकाच प्रकारचे धमकीचे संदेश मिळाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. धमकीचे ई-मेल नेमके कोणी, कुठून आणि कोणत्या उद्देशाने पाठवले, याचा शोध सायबर पोलिसांकडून घेतला जात आहे. संबंधित संदेशांची तांत्रिक तपासणी तसेच ई-मेलच्या स्रोताचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालयीन परिसरात खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या असून, तपास पूर्ण होईपर्यंत पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. धमकीच्या संदेशांमध्ये उल्लेख केलेल्या संभाव्य घटनांबाबतही संबंधित यंत्रणा सतर्क असून, अधिकृत तपासातून पुढील माहिती स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Tags :

.