For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

बांधकाम कामगारांच्या मुलांना 49 शैक्षणिक वस्तूंचा संच; राज्य सरकारची योजनेला मंजुरी: कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहिती

01:44 PM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
बांधकाम कामगारांच्या मुलांना 49 शैक्षणिक वस्तूंचा संच  राज्य सरकारची योजनेला मंजुरी  कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहिती
Advertisement
कुडाळ : महाराष्ट्रातील नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मूलभूत वस्तू संच सहाय्य योजने’ला राज्य शासनाने प्रशासकीय व वित्तीय मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना शैक्षणिक साहित्याचा संच मिळणार आहे. शिवसेना कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख तथा श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

केंद्र सरकारने लागू केलेल्या चार कामगार संहितांमधील सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंतर्गत बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक योजना राबविण्याची तरतूद आहे. त्यानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने शैक्षणिक सहाय्य योजनेत सुधारणा करून विद्यार्थ्यांना वस्तू स्वरूपात शैक्षणिक साहित्य देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावाला आता मंजुरी मिळाली आहे.

Advertisement

या योजनेअंतर्गत पाण्याची बाटली, थर्मास, टिफिन बॉक्स, छत्री, रेनकोट, परीक्षा पॅड, लॉगबुक, ड्रॉइंग बुक, पेन-पेन्सिल बॉक्स, भूमिती कंपास, रंगसाहित्य, सोलर लॅम्प, कॅल्क्युलेटर, फोल्डिंग अभ्यास टेबल, व्हाईट बोर्ड, गजराचे घड्याळ, शाळेची बॅग आणि किट बॅग अशा 22 प्रकारच्या वस्तूंचा समावेश असलेला एकूण 49 वस्तूंचा संच विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या सामान्य परिस्थितीतील बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळण्यास मदत होणार असून जिल्ह्यातील हजारो कामगार कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Advertisement

या कल्याणकारी निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार नीलेश राणे यांचे प्राजक्त चव्हाण यांनी कामगारांच्या वतीने आभार मानले. योजनेच्या अधिक माहितीसाठी श्रमिक संघटनेच्या सेवा संपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.