For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्राने बेळगाव विसरून चालणार नाही!

12:09 PM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्राने बेळगाव विसरून चालणार नाही
Advertisement

अभिनेते हेमंत ढोमे : युवा समितीच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा :  युवा समितीच्या उपक्रमांचे कौतुक

Advertisement

बेळगाव : ‘क्रांतीज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ या चित्रपटाने मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित केला. या चित्रपटातून एक ठिणगी पडल्याने आज गावोगावी मराठी शाळा वाचविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सीमाभागातील मराठी भाषिकांचा लढा हा आपल्या मातृभाषेसाठीचा आहे. मराठी भाषा आणि शाळा वाचविण्यासाठीचा हा लढा पेंव्हा ना पेंव्हा नक्कीच यशस्वी होईल. परंतु महाराष्ट्राने बेळगाव विसरून चालणार नाही, असा झणझणीत टोला अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना लगावला.

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने रविवारी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठा मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अभिनेता हेमंत ढोमे यांनी बेळगावकरांच्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. बेळगावकरांचा प्रवास जरी खडतर असला तरी तो सुखकर होईल, यावर माझा विश्वास आहे. मातृभाषा म्हणजे आपली आई असते आणि आपल्या आईचा लढा नेहमी यशस्वी होतो हे आजवरच्या उदाहरणांमधून दिसून आले असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

व्यासपीठावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव, खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर व युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर उपस्थित होते. यावेळी बोलताना आप्पासाहेब गुरव यांनी युवा समितीच्या उपक्रमांचे कौतुक केले. सुभाष ओऊळकर यांनी मराठी विद्यानिकेतनने मागील काही वर्षात केलेल्या प्रगतीचा आढावा सादर करून मराठी विद्यार्थी कोठेही कमी पडत नाहीत हे स्पष्ट केले.

अंकुश केसरकर यांनी युवा समितीच्या उपक्रमांची माहिती देत महाराष्ट्र सरकारच्या सीमाप्रश्नाबाबतच्या उदासीनतेबाबत शोकांतिका व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी गोरल हिने केले. युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक केले. शिवराज चव्हाण यांनी परिचय करून दिला. मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. या कार्यक्रमाला बेळगाव, खानापूर, संकेश्वर यासह परिसरातील मराठीप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजेत्यांचा गौरव-पुरस्कारांचे वितरण

या कार्यक्रमामध्ये युवा समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आल्या. दहावी परीक्षेत सर्वाधिक गुण घेतलेल्या बेळगाव शहर, ग्रामीण व खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा गौरव झाला. त्याचबरोबर आदर्श शाळा पुरस्कार, ज्ञानज्योती पुरस्कार व ज्ञानशिखर पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.

Advertisement
Tags :

.