For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 12 महत्त्वाचे निर्णय; विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ, वाहनचालकांना चलन सवलत

03:43 PM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 12 महत्त्वाचे निर्णय  विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ  वाहनचालकांना चलन सवलत
Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी, 4 नोव्हेंबर रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित 12 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व निर्वाह भत्त्यापासून वाहनांच्या प्रलंबित दंडावरील सवलत, न्यायालयांची स्थापना आणि कृषी क्षेत्रातील विकासकामांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इंटर्नशिप भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागातील पशुचिकित्सालयांमध्ये सेवा देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणार असून पशुपालकांनाही याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

Advertisement

वसतिगृहात राहणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. विभागीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आता दरमहा 1,500 रुपये, तर जिल्हास्तरीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना 1,300 रुपये निर्वाह भत्ता मिळणार आहे.

वाहनांच्या थकीत दंडावर सवलत

वाहनचालकांसाठी महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलन अभय योजना-2026 लागू करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत प्रलंबित चलनाच्या दंडाच्या रकमेत एकवेळच्या सवलतीच्या स्वरूपात 20 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना थकीत दंड भरून वाहन दंडमुक्त करण्याची संधी मिळणार आहे.

Advertisement

पालघरमध्ये तीन ग्राम न्यायालये

पालघर जिल्ह्यातील तलासरी, मोखाडा आणि विक्रमगड येथे तीन ग्राम न्यायालये स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. प्रत्येक न्यायालयासाठी पाच पदे, अशी एकूण 15 पदे निर्माण करण्यासही मंजुरी मिळाली आहे.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. यापूर्वी मंजूर जोड न्यायालयाऐवजी नियमित वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरू होणार आहे.

नागपूर व गोंदियातील जमीनविषयक निर्णय

नागपूर जिल्ह्यातील बिडगाव-तरोडी (खुर्द)-पांढुर्णा नगरपंचायतीला प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी 1 हेक्टर 86 आर जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली.

गोंदिया शहरातील लिलावाद्वारे किंवा भाडेतत्त्वावर घरांसाठी दिलेल्या जमिनींचे विनामूल्य वर्ग-1 मध्ये रूपांतर करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

सिद्धिविनायक मंदिराला मुद्रांक शुल्कात सवलत

मुंबईतील सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने खरेदी केलेल्या राम मेन्शन इमारतीच्या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिर परिसराचा विकास आणि भाविकांसाठी सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

समूह विद्यापीठाच्या नियमांत बदल

मुंबईतील हैदराबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट युनिव्हर्सिटीच्या कुलाधिकारी पदासाठी कार्यकाळ व वयोमर्यादेची अट वगळण्यास मान्यता देण्यात आली. तसेच कुलगुरू पदावरील व्यक्तीला पुनर्नियुक्तीसाठी पात्र ठरवण्याकरिता अधिसूचनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागपूर येथील दाभा परिसरातील कृषी महाविद्यालयाच्या जागेवर आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र उभारण्यास मंजुरी मिळाली. या प्रकल्पाच्या 644 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत बदल

मुदत संपलेल्या अ वर्गातील तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित झालेल्या 18 सहकारी संस्थांवर प्रशासक नियुक्त न करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम आणि निवडणूक नियमांमध्ये आवश्यक बदल करण्यास मान्यता देण्यात आली.

मोठ्या सहकारी संस्थांवर शासननियुक्त संचालक

राज्यातील 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळावर पाच शासननियुक्त सदस्य नेमण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामध्ये एक सहाय्यक निबंधक दर्जाचा अधिकारी आणि संस्थेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या चार व्यक्तींचा समावेश असेल.

शासकीय अधिकाऱ्याला मतदानाचा अधिकार नसेल, तर अन्य चार सदस्यांना संचालक मंडळात मतदानाचा अधिकार असेल. मात्र, हे सदस्य संस्थेच्या पदाधिकारी निवडणुकीत सहभागी होऊ शकणार नाहीत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना ही सुधारणा लागू राहणार नाही.

या निर्णयांसह मंत्रिमंडळ बैठकीत एकूण 12 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, शिक्षण, वाहतूक, न्यायव्यवस्था, कृषी आणि सहकार क्षेत्रातील विविध घटकांना त्याचा लाभ होण्याची अपेक्षा आहे.

Advertisement
Tags :

.