महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला राजकारणाचा वास! भाजप नेत्या शौमिका महाडिक यांचा आरोप
लैंगिक अत्याचार घटनांचे राजकारण न करण्याचे आवाहन
बदलापूर अत्याचार प्रकरणी शासकीय व सरकारी पातळीवरील सर्व कायदेशीर प्रक्रिया सरकारने पूर्ण केली आहे. तरीही महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडी बंदची हाक देऊन केवळ राजकारण करत असल्याचा आरोप भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच लैंगिक अत्याचार घटना प्रकरणी कोणीही राजकारण करू नये असे आवाहनही महाडिक यांनी केले.
प्रदेश उपाध्यक्ष महाडिक म्हणाल्या, बदलापूर अत्याचार प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांकडून तक्रार नोंदवण्यास दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. आरोपीलाही अटक केली आहे. तसेच या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया ही सरकारने पूर्ण केली आहे. अत्याचाराचे प्रकरण बाहेर आल्यानंतर सरकारने तत्परता दाखवली आहे. सरकारने शासकीय पातळीवरील सर्व प्रक्रिया पूर्ण करून देखील याप्रकरणी महाविकास आघाडी केवळ राजकारण करत आहे. महाविकास आघाडीने शनिवारी दिलेली बंदची हाक देखील राजकारणाचाच एक भाग आहे. बंदची हाक देऊन जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार महाविकास आघाडी करत आहे. लैंगिक अत्याचाराची घटना ही भावनिक असून या प्रकरणांमधून राजकारण करू नये असे आवाहन महाडिक यांनी केले.
त्यापुढे म्हणाल्या, कलकत्ता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर देखील लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हा प्रकार देखील निंदनीय आहे. पण याप्रकरणी महाविकास आघाडी काही बोलण्यास तयार नाही. त्याचबरोबर बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचार विरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली नाही. मात्र बदलापूर घटनेवरून महाविकास आघाडीकडून केवळ राजकारण सुरू असल्याचा आरोप महाडिक यांनी केला.