For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यात सर्वत्र महाप्रसादाची लगबग

10:41 AM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यात सर्वत्र महाप्रसादाची लगबग
Advertisement

बहुतांशी गणेशोत्सव मंडळांतर्फे आयोजन : विसर्जनासाठी नदी, तलाव, विहिरी सज्ज

Advertisement

वार्ताहर/किणये 

तालुक्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. यामुळे शनिवारपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्यावतीने सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन याची लगबग सर्वत्र दिसून येत आहे. बहुतांशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी रविवारी मंडपामध्ये सत्यनारायण पूजा तसेच महाप्रसादाचे आयोजनही केले होते. दिवसभर सत्यनारायण पूजा आणि महाप्रसाद घेण्यासाठी भक्तांची गर्दी दिसून आली.

Advertisement

मंडपामध्ये हरिपाठ ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन

गणेशोत्सवाच्या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध सामाजिक कार्यक्रम राबविले. यामध्ये गायन, भाषण स्पर्धा व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले होते. काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपामध्ये हरिपाठ व ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचनसह प्रवचन, कीर्तन निरूपणाचे कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमांना सर्वांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

सामाजिक संदेश देणारे हालते देखावे सादर

तालुक्याच्या विविध गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक संदेश देणारे हालते देखावे सादर केले आहेत. प्रभू श्रीरामचंद्र, भगवान शंकर, श्रीकृष्ण तसेच विविध देवदेवतांच्या रुपातील श्री गणेशमूर्ती साकारलेल्या आहेत. गणेशोत्सव हा आनंदाची पर्वणी देणारा सण आहे. त्यामुळे सारे जण या गणेशोत्सवामध्ये मग्न झालेले दिसून येत आहेत.रविवारी दिवसभर पूजेची लगबग सर्वत्र दिसून आली. बऱ्याच गावांमध्ये दुपारनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भक्तमंडळी गणेशाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतानाचे चित्र पहावयास मिळाले.

उद्या गणेशमूर्ती विसर्जन

गणेशमूर्ती विसर्जन परिसरात राबविली स्वच्छता मोहीम बापाला निरोप मंगळवारी देण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील अनेक गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे नदी, नाल्यांच्या ठिकाणी बांध बांधून पाणी अडवण्यात येत आहे. काही ठिकाणी विहिरी व तलावाजवळ साफसफाईची मोहीम राबविण्यात येत आहे. जेणेकरून गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी भक्तांना सोयीस्कर ठरेल.

Advertisement
Tags :

.