गडकोट मोहिमेतील धारकऱ्यांसाठी शिवप्रतिष्ठानतर्फे महाप्रसाद
बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने किल्ले रायरेश्वर ते प्रतापगड अशी गडकोट मोहीम नुकतीच पार पडली. या मोहिमेनंतर बेळगाव येथे भिडे गुरुजींच्या आदेशानुसार तुळजाभवानीचा महाप्रसाद म्हणजेच भंडाऱ्याचे आयोजन केले होते. मराठा मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई उपस्थित होते. प्रारंभी प्रेरणा मंत्र म्हणून अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर त्यांनी गडकोट मोहिमेमधील अनुभव तसेच बेळगावमध्ये सुरू करण्यात आलेल्या दुर्गामाता दौड, बलिदान मास, गडकोट मोहीम याविषयीची माहिती दिली. बेळगाव जिल्ह्याचे नेतृत्व किरण गावडे यांच्याकडे कसे आले? तसेच नवीन उपक्रम राबवून तरुणाईला देव, देश आणि धर्माच्या कार्यामध्ये कसे आणले गेले? याची माहिती त्यांनी दिली. शेकडो धारकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, शहरप्रमुख अनंत चौगुले, तालुकाप्रमुख परशुराम कोकितकर, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण तसेच धारकरी उपस्थित होते.