Kolhapur Politics: कोल्हापुरात नव्या राजकीय समीकरणांची नांदी; राजकीय याराना कायम राहील?
राजकीय घुसळण, पारंपरिक मतदानाच्या दृष्टीकोनात बदल होणार?
कोल्हापूर : मागील अडीच-तीन वर्षात राजकारणाची खिचडी झाली आहेच. याची परिणीती म्हणूनच कालचे दुष्मन आज एका व्यासपीठावर आले तर कालचे पाठीराखे एकमेकाला खेचण्यास सज्ज झाले आहेत. यातच पुरोगामी म्हणवणाऱ्या कोल्हापुरात निवडणुकीला पक्षीय मुलामा असला तरी खरी लढत डावे विरुध्द उजवे अशी राजकीय सरमिळीची लढत आहे.
निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या राजकीय घुसळणीमुळे कोल्हापूरकरांचा पारंपरिक मतदान करण्याचा दृष्टीकोनात बदल होणार काय हे पाहणे उत्सुकतेचं ठरेल. जिल्ह्याच्या राजकारणात महाविकास आघाडी स्वागतार्ह असेल काय ? शिंदे गटाचे बंड की उध्दव ठाकरेंची सहानुभूती, थोरले की धाकले पवार, भाजपसाठी अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात स्पेस आहे का? यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे 'महापालिकेच्या 'निकालात दडली आहे. म्हणूनच निकाल हा जिल्ह्याची राजकीय दिशा ठरवणारी असेल असे म्हटल्यास वावगे ठरु नये.
राजकीय याराना कायम राहील ..?
मागील दहा वर्षात महापालिका आणि जिल्हापरिषदेसह विधानसभा निवडणुकीतील मतांच्या गणितांचा आराखडा मांडत मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची जिल्ह्याच्या राजकारणाची गाडी धावत होती. गोकुळ दूध संस्थेत सत्तांतरानंतर या दोघांतील समझोता एक्सप्रेस सुसाट होती. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ना.
मुश्रीफ आणि आ. पाटील यांच्यात निधीवरुन तू-तू मैं-मैं झाले. मात्र, संस्थात्मक राजकारणातील एकी आणि भविष्यातील राजकीय जोडण्याच्या निमित्ताने हे दोघे शिलेदार परस्परांवर टीका करण्याचे टाळत असल्याचे प्रकर्षाने पुढे येत आहे. जिल्ह्यातील नेत्यांचा राजकीय याराना कायम राहिलं का ? हे निकालानंतर स्पष्ट होईल.
आता सोडायचं नाय... लढायचंच...
भाऊ नमस्ते... प्रभागातील सगळी मंडळं आणि लोकांचा पण आग्रह हाय.... आता सोडायचं नाय... आपल्याला संधी हाय... बस्स आपला पाठिंबा पायजेल... तयारी झालीया... असा संवाद कोल्हापुरातील प्रत्येक प्रभागात ऐकायला येत आहे.
आरक्षण सोडतीमुळे नेमकी कोणाला संधी मिळणार हे अद्याप अस्पष्ट आहे. तरी निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही बाजूंचे इच्छूक आपली भागातील प्रतिमा अधिक चांगली करण्यासाठी धडपडत आहेत. स्वतःचा ब्रेन्डिंग करत असतानाच संभाव्य प्रतिस्पर्धी कोण असेल? याची चाचपणी करुन त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे.
खर्च कोटीत
तरुण मंडळासह मतदारांचा कल सांभाळताना उमेदवारांच्या नाकीनऊ येणार आहे. आता मतदारांच्याही त्या अर्थाने अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचे खूप कमी इच्छुक धाडस करतील. इतक्या मोठ्या प्रभागात प्रचार प्रभागात यंत्रणा एकट्याने राबवणे सोपे नाही.
पक्षाची साथ मिळाल्यास मतदारांपर्यंत पोहचण्यासह प्रचार यंत्रणा राबवणे सोपे होणार आहे. त्यामुळे इच्छुकांची पक्ष हीच पहिली चॉईस असेल. पक्षाने संधी दिली तर उभं रहायचे ही सावध भूमिका यातूनच पुढे येत आहे.