For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी समितीचा महामेळावा

11:27 AM Nov 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी समितीचा महामेळावा
Advertisement

म. ए. समिती बैठकीत कार्यकर्त्यांचा निर्धार : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही निवेदन देणार : सीमावासियांना मोठ्या संख्येने सहभागाचे आवाहन

Advertisement

बेळगाव : येत्या 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाविरोधात म. ए. समितीच्यावतीने पहिल्याच दिवशी महामेळावा (महाअधिवेशन) व्हॅक्सिन डेपो मैदानावर घेण्याचा निर्णय मंगळवारी मराठा मंदिरमध्ये झालेल्या मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर होते. 1956 पासून मराठी माणसाचा आवाज दाबण्यासाठी आंदोलने आणि महामेळाव्याची परवानगी नाकारली जाते. तरीही आतापर्यंत अनेक आंदोलने, मोर्चे आणि महामेळावेही यशस्वी झाले आहेत. त्याप्रमाणे 9 डिसेंबर रोजी कर्नाटक सरकारचे अधिवेशन होत आहे.

याविरोधात पहिल्याच दिवशी म. ए. समितीतर्फे महामेळावा (महाअधिवेशन) घेतला जाणार आहे. या महामेळाव्याला परवानगी मिळो अथवा ना मिळो मेळावा यशस्वी करण्याचा निर्धारही कार्यकर्त्यांनी बैठकीत केला. तसेच घटक समित्यांची बैठक बोलावून महामेळाव्याबाबत जागृतीचे काम हाती घेतले जाणार आहे. महामेळाव्यासंदर्भात गुरुवारी पोलीस प्रशासनाची भेट घेऊन परवानगी मागितली जाणार आहे. महामेळाव्याबरोबरच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्याची परवानगीही घेतली जाणार आहे.  महामेळावा यशस्वी करण्याबरोबर मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले जाणार आहे.

Advertisement

प्रशासनाने कितीही दडपशाही केली तरी यंदा महामेळावा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आणि व्हॅक्सिन डेपोतच घेणार असल्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. शिवाय महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीमार्फत करण्यात आले आहे. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, गोपाळराव देसाई, बी. एस. पाटील, अॅड. एम. जी. पाटील, आर. एम. चौगुले, प्रसाद सडेकर, एम. बी. गुरव, अनिल पाटील, बाळासाहेब फगरे, डी. बी. पाटील, मोनाप्पा पाटील, मोनाप्पा संताजी, बी. डी. मोहनगेकर, रामचंद्र मोदगेकर, मनोहर हुंदरे, रणजित चव्हाण पाटील, आर. के. पाटील यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.