सिग्नल यंत्रणेत छेडछाड, महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ; सालपा स्थानकाजवळ रेल्वे थांबवून महिलांची लूट
मिळालेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी एक्स्प्रेस रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास सालपा स्थानकाजवळ आली असता चोरट्यांनी सिग्नल यंत्रणेत बिघाड करून रेल्वे थांबवली. त्यानंतर आठ ते दहा जणांच्या टोळीने एस-2 डब्यात प्रवेश केला. कोल्हापूर येथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी प्रवास करणाऱ्या तीन महिला प्रवाशांना लक्ष्य करत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले.
लूटमार केल्यानंतर चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी पाठलाग रोखण्यासाठी चोरट्यांनी एस-2, एस-3 आणि एस-5 या डब्यांवर दगडफेक केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
या घटनेच्या वेळी रेल्वे सुरक्षा दलाचे तीन कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते. मात्र, चोरट्यांनी लूटमार करून पलायन केले. टोळीतील काही जण सिग्नल यंत्रणेजवळ थांबले होते, तर काही जण रेल्वेतूनच प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच मिरज रेल्वे पोलिसांना कळवण्यात आले. याप्रकरणी मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक सातारा जिल्ह्यात रवाना झाले आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची मोठी वर्दळ असताना धावत्या रेल्वेतील सिग्नल यंत्रणेत बिघाड करून महिलांची लूटमार झाल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
