धामणेत महालक्ष्मी-मारुती मंदिर कळस मिरवणूक उत्साहात
दोन मंदिरांचा लोकार्पण सोहळा : 26 पर्यंत विविध कार्यक्रम, महाप्रसाद
वार्ताहर /धामणे
धामणे येथील श्री महालक्ष्मी मंदिर आणि श्री मारुती मंदिरांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त गुरुवार दि. 23 पासून कळस मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात, भंडाऱ्याच्या उधळणीत काढण्यात आली. कलमेश्वर मंदिर येथून देवस्की पंच कमिटी व भाविकांच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर देवगणहट्टी येथून सुवासिनी डोकीवर कलश घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. दोन्ही मंदिरांचे कळस रथामध्ये आरूढ होते. धामणे विभाग शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी व युवक ‘लक्ष्मी माता की जय’च्या जयघोषात रथ ओढत होते. मिरवणूक मासगोंडहट्टी, काळम्मानगर, कुरबरहट्टी, ब्रम्हलिंगहट्टी येथून फिरून बसवाण गल्ली येथे पोहचली. भंडाऱ्याच्या उधळणीत युवक न्हाऊन गेले होते. रात्री गावभर फिरून मिरवणुकीची लक्ष्मी आणि मारुती मंदिर आवारात सांगता झाली.
शुक्रवार दि. 24 रोजी लक्ष्मीदेवी मंदिर कळसारोहण, गो-माता प्रवेश व वास्तूशांती प्रवेश, होमपूजन व पडल्यांचा कार्यक्रम, महाप्रसाद, सायंकाळी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, शनिवार दि. 25 रोजी मारुती मंदिर कळसारोहण, अभिषेक व होमपूजन, संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते अभिषेक व पूजन, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी हणमंत मिसाळे महाराज सांगली यांचे कीर्तन होणार आहे. रविवार दि. 26 रोजी सकाळी 9 वा. श्री अडवीसिद्धेश्वर महाराजांचे प्रवचन, माधव प्रभूजी यांचे गो-माता व भारतीय संस्कृतीबद्दल प्रवचन, मान्यवरांचा सत्कार, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी सांस्कृतिक मराठी लोकनाट्या याप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत.
भिडे गुरुजी उपस्थित राहणार
धामणे येथील श्री मारुती मंदिर तसेच श्री महालक्ष्मी मंदिरांचे कळसारोहण श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक भिडे गुरुजी यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम शनिवार दि. 25 रोजी सकाळी 7 वाजता होणार आहे. बेळगावमधील धारकऱ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, अशी माहिती कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी दिली.